सायन्सस्कोर मैदानाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र समितीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:14+5:302021-04-08T04:14:14+5:30
अमरावती : शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानात संरक्षण भिंतीसह अन्य ...
अमरावती : शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानात संरक्षण भिंतीसह अन्य कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत या मैदानाचे संचालन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या हालचाली झेडपी प्रशासनाकडून सुरू आहेत. तसा प्रस्ताव मंजूर झाल्यास या मैदानावर होणाऱ्या प्रत्येक आयोजनावर शुल्क वसूल करण्याची बाबही विचाराधीन आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्याचा प्रशासनाचा विचाराधीन आहे.
सद्यस्थितीत सायन्सस्कोर मैदानाचे नियंत्रण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आहे. मात्र, अनेकदा याबाबत तक्रारी येत असल्याने याकरिता स्वतंत्र समिती स्थापन केल्यास सुटसुटीतपणा येईल, असे मानले जात आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे एक महत्त्वाचे स्रोत असलेले सायन्सकोर मैदान मागील अनेक वर्षे दुर्लक्षित होते. मैदानावर कुणाचेच प्रत्यक्षात नियंत्रण नसल्यामुळे या मैदानावर असामाजिक तत्त्वांचा वावरही वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय भिक्षेकरी यांचे याठिकाणी डेरे असतात. अवैध प्रवासी वाहतुकीचे ठिकाणच बनले होते. मात्र, आता जिल्हा परिषदेकडून मैदानाभोवती संरक्षण भिंत बांधण्यात येत असून, मैदानाचे समतलीकरण केले जात आहे. एकूणच सायन्सस्कोर मैदानाचा कायापालट होत असून, मैदानाची देखभाल दुरुस्ती व नियंत्रणासाठी एक स्वतंत्र समिती तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर विचाराधीन आहे.
बॉक्स
स्थायी समितीत चर्चा
जिल्हा परिषदेच्या गत २५ मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येगडे यांनी स्वतंत्र समिती स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार सभागृहाने यावर एकमत दर्शविले होते. त्यानुसार आता हालचाली सुरू आहेत.