अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्ट्रीने यावर्षीच्या बजेटमध्ये पाणंद रस्ते योजना सुरू करावी, अशा आशयाचा प्रस्ताव झेडपी आमसभेत सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडला. यावर योग्य निर्णय घेण्याचे संकेत पीठासीन सभापतींनी दिले आहेत.
दरवर्षी पावसाळयाच्या दिवसांत रस्त्याअभावी शेतात जाण्या- येण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, रस्ते योग्य नसल्यानेही शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गत वर्षीही पावसामुळे शेतीचे रस्ते खराब झाले. परिणामी, शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्ट्रीने शासनाप्रमाणेच जिल्हा परिषदमार्फत पाणंद रस्ते योजना राबवावी याकरिता जिल्हा निधीमध्ये १ कोटी रुपयाची तरतूद करावी, असा ठराव आमसभेत मांडला. यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सध्या एवढी तरतूद करणे अशक्य असल्याचे सभागृहात सांगत आगामी जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये झेडपी पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल व याकरिता आवश्यक निधीची तरतूदसुद्धा करण्याचे आश्वासन सभागृहात सदस्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी झेडपी बजेटमध्ये पाणंद रस्ते योजना राबविली जाणार आहे.