समाधीस्थळी गुरुदेव भक्तांचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:36+5:302020-12-12T04:30:36+5:30
फोटो पी १० तिवसा बाहेरच्या पानासाठी तिवसा : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने मोझरी स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...
फोटो पी १० तिवसा बाहेरच्या पानासाठी
तिवसा : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने मोझरी स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमातील प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला विरोध म्हणून शुक्रवारी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले. प्रार्थना मंदिर जतन करून ठेवण्याची मागणी गुरुदेव भक्तांकडून करण्यात आली. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राजाराम बोथे यांना निवेदन सोपविण्यात आले.
गुरुकुंज मोझरी येथे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधी व आश्रम आहे. याच आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी विकास आराखड्यातून नवीन भव्य प्रार्थना मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे जुने प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णय अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने काही महिन्या अगोदर घेतला. मात्र, त्यावर अंमल करण्यात आलेला नाही. आश्रमातील प्रत्येक वस्तू ही राष्ट्रसंतांच्या पावन स्पर्शाने पुनित झाल्याने व लाखो गुरुदेव भक्तांच्या भावना आश्रमाशी जुळल्या असल्याने आश्रमातील कुठलीही वस्तू पाडू न देण्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला आहे. त्यामुळे महाराजांचे प्रार्थना मंदिर पाडण्याच्या निर्णयाला समस्त गुरुदेव भक्तांकडून विरोध केला जातो आहे.
याच अनुषंगाने शुक्रवारी राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी काही गुरुदेव भक्त व महिलांनी निषेध आंदोलन केले. यावेळी जयकुमार बोके, गजानन सोनटक्के, श्रीकांत टाकरखेडे, रोशन भोंगाडे, उमेश परिसे, प्रथमेश कांडलकर, प्रतिभा खारकर, वर्षा कडू, निर्मला बोके, चंद्रकला मानमोडे, लीला इंगळे, सुलोचना सोनटक्के, सीमा खारकर यासह गुरुदेवभक्त उपस्थित होते.