बांधकाम परवानगीमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:31 PM2019-07-18T23:31:00+5:302019-07-18T23:31:37+5:30
केंद्राच्या जलशक्ती अभियानात देशातील २५५ व राज्यातील सात शहरांमध्ये अमरावतीची निवड करण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत शहराचा भूजलस्तर वाढविण्यासाठी आता जलसंधारणाची कामे केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या १५ ही विभागांना आयुक्त संजय निपाणे यांनी जबाबदारी सोपवली आहे. यानुसार झोनद्वारे बांधकाम परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्राच्या जलशक्ती अभियानात देशातील २५५ व राज्यातील सात शहरांमध्ये अमरावतीची निवड करण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत शहराचा भूजलस्तर वाढविण्यासाठी आता जलसंधारणाची कामे केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या १५ ही विभागांना आयुक्त संजय निपाणे यांनी जबाबदारी सोपवली आहे. यानुसार झोनद्वारे बांधकाम परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
शहरातील भूजल पुनर्भरण व्हावे, यासाठी चार महिन्यांपासून महापालिकाद्वारे नागरिकांच्या लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अशातच शहराची निवड केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानात करण्यात आल्याने आता या लोकचळवळीला प्रशासनाचा आधार लाभलेला आहे. याअनुषंगाने केंद्रीय नगरविकास सचिवांनी काही निर्देश जाहीर केले आहेत. त्याला अनुसरून आयुक्त संजय निपाणे यांनी महापालिकेच्या १५ विभागांच्या प्रमुखांना अभियानाच्या निमित्ताने जबाबदारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
अभियानानिमित्त कार्यकारी अभियंता-२ यांना प्रत्येक झोनमधील विहीर, बोअरवेल व तलावाचे पुनरुज्जीवन, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याबाबत सूचना देणे व संबंधितांना रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सर्व प्रभाग अभियंत्यांना दरमहा १०० रेन वॉटर हार्वेस्टिंगचे उद्दिष्ट आहे. सर्व शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत चित्रकला स्पर्धा राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व शिक्षकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रेरक नेमण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून पालकांच्या सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल.
शासकीय इमारतींना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’
जलशक्ती अभियानाच्या निमित्ताने शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे बंधनकारक करण्याची सूचना किंवा आदेश देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे महापालिकेच्या सर्व इमारतींना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. ‘आयईसी’ प्रभावीपणे राबविणे, महापालिकेच्या सर्व रस्त्यांच्या बाजूला शोषखड्डे करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रभाग अभियंत्यांना त्यांचे अधिनस्थ प्रभागातील नागरिकांना या अभियानाची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी लागेल.
परवानगीच्या सर्व इमारतींमध्ये जलसंधारण
सहायक नगररचना संचालकाद्वारे २०१६-१७ ते आतापर्यंत परवानगी दिलेल्या सर्व इमारतींना व सर्व जुन्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची जबाबदारी आयुक्तांनी सोपविली आहे. कार्यकारी अभियंत्यांद्वारा सर्व शासकीय इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येऊन याची माहिती शासनाचे संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर याबाबत मार्गदर्शक लिंक टाकण्यात येणार आहे. सर्व व्यवस्थापक व समूह संघटकांद्वारा सर्व बचत गटातील महिलांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जलजागृती करण्यात येऊन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
शहरातील सर्व खासगी दवाखान्यात जलसंधारण
अभियानात शहरातील सर्व खासगी दवाखानाचे इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. शहरातील मोकळ्या जागेवर तसेच खुल्या भूखंडावर शोषखड्ड्यांची निर्मिती करण्याचे आरोग्य विभागाला आदेशित केले आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. याचप्रमाणे सहायक आयुक्तांद्वारे हॉटेल, मंगल कार्यालये, दवाखाने, मोठ्या आस्थापना, मॉल्स या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे.
जलशक्ती अभियानासाठी अमरावतीकरांचा सकारात्मक सहभाग लाभलेला आहे. महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी जलजागृतीची लोकचळवळ उभारलेली आहे. त्याच दिशेने केंद्र शासनाचे हे पाऊल आहे. यासाठीचा बेसलाइन डेटा पाठविण्यात आला.
- संजय निपाणे, आयुक्त.