ग्रंथोत्सव प्रदर्शनी : कादंबरीकार रमेश अंधारे यांचे प्रतिपादन अमरावती : वाचनातून जीवनदृष्टी आणि समृध्दी मिळते, यासाठी सतत वाचन करावे, असा मौलिक सल्ला कादंबरीकार आणि माजी प्राचार्य रमेश अंधारे यांनी दिला.महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, साहित्य संस्कृती मंडळ आणि अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील जवादे मंगल कार्यालयात आयोजित ग्रंथोत्सव २०१५ चे उद्घाटन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात रमेश अंधारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड उपस्थित होते. पुढे बोलताना अंधारे म्हणाले की, वाचनातून मिळालेली आत्म्याची समृध्दी ही रुपये आणि सोन्यात मोजता येत नाही. वाचनातून बुध्दी, मन, चित्त शुध्द होते. अहंकार दूर होतो. वाचनातून अंत:करण पुष्ट होते. राष्ट्रीय मूल्यांची वृध्दी करण्यासाठी आपली जन्मजात मूल्य वाढवायची असतात, असे सांगून अंधारे म्हणाले की, ग्रंथ वाचनातून विचार जन्माला येतात, लहानपणापासूनच तात्त्विक विचार पेलणारा समाज निर्माण होतो. मनपा आयुक्त डोंगरे म्हणाले की, आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत वाचन गरजेचे आहे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांस मुबलक ग्रंथ संपदा वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावी. सीईओ अनिल भंडारी यांनीही मार्गदर्शन केले. माहिती संचालक मोहन राठोड म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविणे आजच्या स्पर्धेच्या काळात गरजेचे आहे. वाचनाची भूक भागविण्यासाठी आम्ही ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध करुन देतो. याशिवाय स्थानिक कवि, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होते. कलाकारांचा गौरव करतो. वाचकांकडून यासाठी मोठा प्रतिसाद लाभत आहे. शासकीय ग्रंथपालांकडून शासनाची दुर्मीळ प्रकाशनेही या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असेही राठोड यांनी उपस्थितांना सांगितले.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. ग्रंथोत्सवात विविध सर्वच विषयांवरील पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. शासनाच्या ग्रंथागार विभागाची दुर्मीळ शासकीय प्रकाशनेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीपर्र्यंत चालणार आहे. कार्यक्रमाला बारसकर, योगेश गावंडे, हर्षल हाडे, दीपाली ढोमणे, सागर राणे, तिडके, जोशी,अंधारे, विभागीय माहिती कार्यालयातील सचिन ढवन, गडकरी, गजानन जाधव, पुनसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाचनातून जीवनदृष्टी, समृध्दी मिळते
By admin | Published: February 04, 2015 11:07 PM