इसारचिठ्ठी झालेल्या प्लॉटची परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:47+5:302021-05-06T04:13:47+5:30
अमरावती : इसारचिठ्ठी झालेल्या प्लॉटची परस्पर विक्री करून, ते दस्तावेज सेंट्रल बँकेत परस्पर गहाण ठेवून कर्ज घेतल्याचा ...
अमरावती : इसारचिठ्ठी झालेल्या प्लॉटची परस्पर विक्री करून, ते दस्तावेज सेंट्रल बँकेत परस्पर गहाण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार राजापेठ हद्दीत उघडकीस आला. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री बिल्डर संदीप हेडाऊ, शिवसेनेचे नगरसेवक भारत छेदीलाल चौधरी, सुजित गिरीधारी तायडे आणि एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी भारत चौधरी आणि सुजित तायडेला अटक केली असून, बुधवारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप चंद्रकांत वैद्य (६३ रा. सामरानगर) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी प्लॉटची इसारचिठ्ठी केली होती. त्यानंतर कुठलीही परवानगी न घेता तो प्लॉट सेन्ट्रल बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले. सदर प्लॉट खाली करण्यासाठी आरोपींनी मुलाला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची सर्व रेकॉर्डिंग असल्याचेही दिलीप वैद्य यांनी राजापेठ ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ४२०, ५०६ (ब), २९४, ३८६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मंढाळे करीत आहेत.