वरूड : येथील शासकीय रक्तपेढीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी तिचे कार्यान्वयन रखडले आहे. कोरोना काळात संपूर्ण राज्यात रक्ताची कमतरता असताना, तसेच वरूड तालुक्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण असल्याने आतातरी शासकीय रक्तपेढी विनाविलंब सुरू व्हावी, अशी भावना रक्तसंकलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
वरूड तालुका राज्याचा आणि जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. तालुक्याला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. अपघाताचे प्रमाण आणि आदिवासीबहुल भाग अधिक असल्याने रुग्णाला वेळीच रक्तपुरवठा होऊ शकत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. याकरिता ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाचे मोफत रक्तपिशव्या देण्याचे कार्य सुरू आहे. परंतु रक्तपेढी असल्यास वेळीच रक्तपुरवठा होण्यास मदत होऊ शकते, याकरिता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थानी पाठपुरावा करून रक्तपेढी मंजूर करून घेतली. मात्र, आता ही रक्तपेढी कार्यान्वित कधी होणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत.