ऑनलाईन फसवणुकीतील ६४ हजार फिर्यादीला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:45+5:302021-05-06T04:13:45+5:30
अमरावती : ऑनलाईन फसवणूक करून ६४ हजार रुपये सायबर गुन्हेगाराने लंपास केले. शहर सायबर पोलिसांनी त्याचा तांत्रिक तपास करून ...
अमरावती : ऑनलाईन फसवणूक करून ६४ हजार रुपये सायबर गुन्हेगाराने लंपास केले. शहर सायबर पोलिसांनी त्याचा तांत्रिक तपास करून ६४ हजारांची रक्कम मूळ मालक असलेल्या फिर्यादीला बुधवारी परत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांनी शहर सायबर पोलिसांची आभार मानले. ही कामगिरी सायबर पोलिसांनी केली.
तक्रारकर्ता संजय नंदलाल सारडा (रा. जाधव ले- आऊट सातुर्णा) यांना २९ एप्रिल रोजी सायबर गुन्हेगाराने फोन करून एचडीएफसी लाईफ विमा कंपनीतून बोलतो, अशी बतावणी करून विमा पॉलिसीचा हफ्ता घेण्याकरिता फेक लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगितले. ते पैसे एफडीएफसी लाईफ मध्ये जमा न होता इतरत्र ट्रान्सफर झाले. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी याचा तांत्रिक तपास करून फिर्यादीची रक्कम परत मिळविली. ही रक्कम फिर्यादी यांना पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शहर सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे, पीएसआय कपिल मिश्रा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
फसवणूक झाल्यास पोलिसांत तक्रार करा
फोन-पे, पेटीएम, गुगल-पे, केवायसीच्या नावावर, कॅशबॅकचे आमीष दाखवून, मोबाईलवर फेक लिंक पाठवून तसेच, टिम व्युवर, ॲनीडेस्क, असे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तसेच मोबाईलचा ताबा घेऊन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहावे. त्याची पडताळणी करावी, तसेच फसवणूक झाल्यास तत्काळ बँक व पोलिसांना सांगावे, तसेच बँक खात्याची माहिती, क्रेडिट, डेबिट कार्ड डिटेल्स व ओटीपी कुणालाही देऊ नये, असे आवाहन शहर सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी केले.