अडीच वर्षांची चिमुकली, देशभरातील पंधरा बाल-गोपालांमधून विजेती
अमरावती : गोव्याच्या पंजीम येथे आयोजित इंडियाज सुपर किड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिवसा येथील अवघी अडीच वर्षे वयाची चिमुकली ऋतुंबरा वानखडे ही विजयी ठरली. एफनेक्स इंडिया आणि केपी-टू प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. ती तिवस्याचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांची मुलगी आहे.
देशभरातून ३ ते १० वर्षे वयोगटातील केवळ १५ मुलामुलींची या स्पर्धेसाठी मुंबई येथे जानेवारी महिन्यात निवड करण्यात आली होती. यात चिमुकल्या ऋतुंबराचा समावेश होता. तिने या स्पर्धकांमधून अप्रतिम हावभावाने परीक्षकांचे हृदय जिंकले व ती विजयी ठरली. हिंदी सिनेसृष्टीतील नायिका कायनात अरोरा हिच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी ऋतुंबराला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आयोजक तथा मिसेस इंडिया २०१९ किरण पंजवाणी, परीक्षक तथा मिस युनायटेड नेशन २०१८ डॉ. श्रेया संसारा, टीव्ही कलावंत खुशी पंजवाणी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये तिने यश मिळविले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.