दरोडा टाकला, नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: March 24, 2024 05:57 PM2024-03-24T17:57:35+5:302024-03-24T17:57:47+5:30
दरम्यान, दत्तापूर ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात २०१५ पासून फरार असलेला आरोपी धम्मपाल साखरे याबाबत पथकाला माहिती मिळाली.
प्रदीप भाकरे
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मार्च रोजी नागपुरातून अटक केली. तो सन २०१५ पासून फरार होता. धम्मपाल शेषराव साखरे (३९, रा. जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे, ह. मु. योगी अरविंदनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याकरिता पथकांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, दत्तापूर ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात २०१५ पासून फरार असलेला आरोपी धम्मपाल साखरे याबाबत पथकाला माहिती मिळाली.
त्या आधारावर पथकाने त्याला अटक करून दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व मुलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, चंद्रशेखर खंडारे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, संजय प्रधान, सागर धापड, शिवा शिरसाठ यांनी केली.