रूंदसरी, वरंबा पद्धतीची पेरणी लाभदायक
By admin | Published: July 3, 2014 11:18 PM2014-07-03T23:18:22+5:302014-07-03T23:18:22+5:30
कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ठोकळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यातील एक महिना कोरडा गेला.
पावसाअभावी उपाययोजना : कोरडवाहू क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याची गरज
गजानन मोहोड - अमरावती
कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ठोकळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यातील एक महिना कोरडा गेला. त्यामुळे उर्वरित पाऊस कोरडवाहू पिकांसाठी पुरेसा आहे का? यामुळे उत्पन्नात घट होईल काय? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे पावसाची साठवणूक करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रूंदसरी, वरंबा पद्धत वापरणे महत्त्वाचे ठरते. जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशी, तूर, मूग, उडीद पिके घेतली जातात. जिल्ह्यातील १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली व ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.
कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रात्याक्षिक
हवामानातील बदल, तापमानातील वाढ, अनिश्चित स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर एक महिन्यापासून पाऊसाने दडी मारल्याने खरीपाची पेरणी रखडलीे. त्या स्थितीत ‘मूलस्थानी जलव्यवस्थाना’द्वारा शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात शेतकरी मुख्यत्वे करून उपलब्ध असलेल्या यंत्र सामुग्रीचा वापर करून पारंपारिक पध्दतीने शेत करतात. यामध्ये बियाण्यांचे असमान वाटप, जास्तीचे बियाणे, दोन रोपामधील असमान अंतर, कुशल मजुरांची कमतरता, दिवसेंदिवस वाढणारी मजूरी, पेरणीसाठी लागणारा वेळ यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यासाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी ट्रॅक्टरचलित रूंदसरी व वरंबा टोकनयंत्र विकसीत करून महाराष्ट्र कृषी औद्योगीक विकास महामंडळाद्वारे समोर आणले आहे. सध्याची जिल्ह्यची स्थिती पाहता कृषी विभाग व कृषी विज्ञान घातखेड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. या यंत्राचा उपयोग सोयाबिन, तूर, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा, गहू यासह अन्य पिकांच्या टोकन पध्दतीने पेरणीसाठी करण्यात येतो.
बियाण्याची बचत, उत्पन्नात वाढ
पारंपारीक पध्दतीने पेरणी केल्यास सोयाबिनचे एकरी ३० किलो बियाणे लागते. परंतु सरी, वरंबा पध्दतीने २२ ते २४ किलो बियाणे लागते. शेतकऱ्यांजवळ हे यंत्र उपलब्ध असेलच असे नाही. त्यांना जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातून ‘ना नफा ना तोटा’तत्वावर हे यंत्र भाडे तत्वावर मिळते. तरीही शक्य नसल्यास तिफन किंवा पेरणी यंत्राणे पेरणी करून सुध्दा बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. शेतकऱ्यांनी तीन ते चार तासानंतर पेरणी न केलेले एक तास सोडून द्यावे. त्यानंतर साध्या नांगराने किंवा डवऱ्याने दोरी बांधून रूंद वरंबा सरी तयार करणे महत्वाचे आहे.
कोरडवाहूसाठी बीबीएफ वरदायी
आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट) ही संस्था जगातील अविकसीत देशामध्ये काम करते. या संस्थेद्वारे प्रथम बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला व हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. पावसाची अनिश्चितता असल्याने पीक जगविणे व उत्पादकता वाढविणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. आदर्शग्राम राळेगाव सिध्दी येथे अन्ना हजारे व हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करून समृध्दी निर्माण केली आहे. (प्रतिनिधी)