पालवाडीत पावसामुळे घराचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पालवाडी गावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पालवाडी गावात एका घराचे छत कोसळून मोठे नुकसान झाले.
ओमप्रकाश विठोबा थोरात यांच्या घराचे छत २६ ऑक्टोबर रोजी पावसामुळे कोसळले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर थोरात कुटुंब उघड्यावर आले आहे. १९ ऑक्टोबरपासून तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व पाऊस येत असल्याने सोयाबीन कापणी थांबली आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. पावसामुळे शेतमजूरदेखील घरीच असल्याचे वास्तव आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वी सोयाबीन विकून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते. मात्र, आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे तिवसा तालुक्यात सोयाबीन शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतमजूरदेखील आठ दिवसांपासून घरीच आहेत. परिणामी शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली.