रा.सू. गवई स्मारकाच्या जागेची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:48+5:302021-07-25T04:12:48+5:30
स्मारकासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, काम गतीने करण्याचे निर्देश अमरावती : माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या ...
स्मारकासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, काम गतीने करण्याचे निर्देश
अमरावती : माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी नियोजनानुसार आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल. हे काम गतीने होण्यासाठी प्रशासनानेही कामांना वेग देण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी येथे दिले.
येथील विद्यापीठ परिसरातील स्मारकाच्या कामांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे आदी यावेळी उपस्थित होते.
दिवंगत दादासाहेब गवई यांचे राजकीय, सामाजिक पटलावरील कर्तृत्व हे देशपातळीवरील होते. भूमिहिनांचा सत्याग्रह, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचे ते अग्रणी नेते होते. अमरावती जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व तसेच, ते केरळ, बिहार आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही होते. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक व्हावे, ही अमरावतीकरांची इच्छा लवकरच पूर्णत्वास येईल. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही ना. ठाकूर यांनी दिली.
---------------
पूर्णाकृती पुतळा, सभागृहाचे नियोजन
स्मारकासाठी नगरविकास विभागाकडून २० कोटी ३ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्मारकात दादासाहेब गवई यांचा पूर्णाकृती पुतळा, जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह, कॅफेटेरिया, दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह, आवारभिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण, वाहनतळ आदी कामे होणार आहेत. काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.