आरटीओने जप्त केलेल्या ऑटोरिक्षांचे झाले सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:31+5:30
आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा दंड भरुन नियमानुसार ऑटोरिक्षा सोडवून नेत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाहनमालकाच्या नावावर ऑटोरिक्षाचा चालक परवाना नसणे, आरटीओच्या नियमानुसार ऑटोरिक्षांचा कर न भरणे, अनेक वर्षे कर बुडीत ठेवणे किंवा नियमाने ऑटोरिक्षांचे फिटनेस नसणे आदी कारणांनी आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक कारवाईदरम्यान ऑटोरिक्षा जप्त करतात. त्यानंतर त्या ऑटोरिक्षा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात येतात. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ऑटोरिक्षांचे इंजीनसह इतर साहित्य गायब असून, फक्त ऑटोरिक्षांचे सापळे तेवढे राहिले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा दंड भरुन नियमानुसार ऑटोरिक्षा सोडवून नेत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे सदर ऑटोरिक्षा पडून राहिल्यास आरटीओ परिवहन विभागाकडून त्यांच्यासह इतर वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी घेते व सदर ऑटोरिक्षांचा जाहीर लिलाव करण्यात येतो. अशा प्रकारचा लिलाव यापूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आला होता. त्यामध्ये २५ ऑटोरिक्षांचा लिलाव करण्यात आला होता, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर जप्त झालेल्या ऑटोरिक्षांचे सुटे भाग परिसरातून चोरीला गेल्याची जोरदार चर्चा आहे. सदर सुटे भाग हे चालकच घेवून गेले की चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी, ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. एकदा परिसरात ऑटोरिक्षा लावला की, त्याकडे अधिकाऱ्यांचेसुद्धा दुर्लक्ष होते. त्यामुळे ऑटोरिक्षा दंड भरुन ज्यांना सोडून न्यायचा नाही, ते आरटीओकडे जप्त असलेल्या ऑटोरिक्षाचे विविध महत्त्वाचे सुटे भाग काढून नेत असल्याची चर्चा आहे. याला नेमकी कुणाची संमती असते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरटीओने रीतसर जप्त केलेल्या वाहनांचे इंजीन व इतर साहित्य चोरीला जातेच कसे, असा प्रश्नसुद्धा पुढे येत आहे.
गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात २५ ऑटोेरिक्षांचा लिलाव करण्यात आला आहे. रात्री गस्तीवर एकच वॉचमॅन आहे. त्यामुळे आॅटोरिक्षांच्या सुट्या भागांची चोरी झाली असावी. याची माहिती मागविण्यात येईल.
- रामभाऊ गिते
प्रादेशिक परिवहन अधिकारी