आर्सेनिकच्या प्रतीक्षेत ग्रामीण जनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:21+5:302020-12-26T04:11:21+5:30
अमरावती : कोरोना संसर्ग नाहीसा होण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. यातच दुसरी लाट येण्याची चर्चा रंगत असल्याने जनतेने आणखी ...
अमरावती : कोरोना संसर्ग नाहीसा होण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. यातच दुसरी लाट येण्याची चर्चा रंगत असल्याने जनतेने आणखी धस्का घेतला आहे. कोरोनापासून बचावासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या ग्रामीण भागात वाटपाचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला निर्णय होऊन सहा महिने उलटले. परंतु अद्याप या गोळ्या ग्रामीण भागात वाटप झालेल्या नाहीत.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूने देशभरात चितेंचे वातावरण पसरविले आहे. राज्यातदेखील कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट, जून महिन्यापासून बाधितांची संख्या वाढली होती. आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे आयुष मंत्रालयाने नमूद केले. त्यामुळे अनेकांनी या गोळ्यांचा डोस सुरू केला आहे. ग्रामविकास मंत्रालयानेदेखील या गोळ्या ग्रामीण जनतेला वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने १४ वित्त आयोगाच्या व्याजातून गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली. निधीची तरतूद करूनही गोळ्यांचा कंत्राट कुणाला द्याया याचा निर्णय झालेला नाही. कोरोनाची जून, जुलै महिन्यात तीव्रता जेवढी होती, तेवढी आजघडीला नाही. जिल्हाभरात दररोज ४० ते ५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. येत्या काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाटदेखील येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून ग्रामीण जनतेला आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या उपलब्ध होणे गरजेचे आहे.