आता वर्षभर नागरिकांना वस्तू, साहित्य खरेदीची सोय, येरवडानंतर अमरावती कारागृहात ‘उडाण’ प्रयोग
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांकडून उत्पादित वस्तुंसाठी ‘उडाण’ या नावाने मॉल साकारण्यात आला आहे. येरवडानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात हा प्रयोग राबविला जात आहे. चांदूर रेल्वे मार्गालगत हा मॉल निर्माण झाला असून, लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
कारागृहात सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत बंदीजनांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बंदीजनांचे आचरण, विचार आणि कृतीत बदल होण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनाच्या कौशल्यानुसार कामे दिली जातात. त्यानुसार कारखाना विभागात बंदीजनांकडून विविध प्रकारच्या वस्तू, साहित्य उत्पादित केले जातात. आता या वस्तु विक्रीसाठी स्वतंत्रपणे ‘मॉल’ साकारण्यात आला आहे. या मॉलसाठी डीसीपीतून ४८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या मॉलमधून विक्री होणाऱ्या वस्तूंचा हिशेब ई-मेलद्धारे वरिष्ठांना पाठविला जाणार आहे. यापूर्वी कारागृहातील बंदीजनांच्या हातून तयार वस्तुंची केवळ दिवाळीत विक्री व्हायची. आता ही सुविधा मॉलच्या माध्यमातून निरंतरपणे राहणार आहे.
--------------
डीपीसीतून ४९ लाख ९७ हजारांचा निधी मॉलच्या निर्मितीसाठी देण्यात आला होता. हल्ली मॉल तयार झाला असून, येरवडानंतर तो दुसरा ठरणारा आहे. या मॉलला चारवेळा भेट देखील दिली आहे. बंदीजनांकडून उत्पादित वस्तूंची येथे विक्री केली जाणार आहे.
- वर्षा भाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी