आयुक्तांवर शाईफेक प्रकरण पेटले; चारही आरोपींना पोलिसांकडून अमानुष मारहाणीचा आरोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:33 PM2022-02-12T19:33:04+5:302022-02-12T19:36:07+5:30
Amravati News अमरावती महापालिका आयुक्तांवरील शाईफेक व जीवघेणा हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींना राजापेठ पोलिसांकडून अमानुष मारहाण केली जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.
अमरावती: महापालिका आयुक्तांवरील शाईफेक व जीवघेणा हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींना राजापेठ पोलिसांकडून अमानुष मारहाण केली जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. शनिवारी दुपारी त्यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तासभर चर्चा केली. त्या भेटीनंतर त्या माध्यमांशी बोलल्या.
महापालिका आयुक्तांनी प्रकृतीचे कारण सांगून भेट नाकारल्यानंतर खासदार राणा निवडक कार्यकर्त्यांसह राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. तेथे पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक आयुक्त भारत गायकवाड यांच्याशी त्यांनी सुमारे एक तास चर्चा केली. आमदार राणा घटनास्थळी नसताना ते आरोपी कसे, त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा कसा? असा प्रश्नांचा भडिमार करत राजापेठ पोलीस राजकीय दबावाखाली निरपराध असलेल्या अजय बोबडे, महेश मूलचंदाणी, संदीप गुल्हाने व सूरज मिश्रा यांचा छळ चालविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना जेवण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. आ. राणा यांचे नाव घेण्यासाठी त्यांना मारहाण केली जात आहे. संजय हिंगासपुरे यांना देखील धमकावण्यात आलेे. त्यामुळे राजापेठमधील सहायक पोलीस निरीक्षक राऊत व संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन खा. राणा यांनी दिले.
ठाण्याच्या आवारात बॅरिकेडिंग
खासदार नवनीत राणा या राजापेठ पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच दुपारी १२ वाजेपासूनच ठाण्याच्या आवारात बॅरिकेडिंग करण्यात आली. दंगा नियंत्रण वाहन आडवे लावण्यात आले. अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली. तथा सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. राजापेठ पोलिसांच्या सहकार्यासाठी शहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज, गुन्हे शाखेचे प्रमुख अर्जुन ठोसरे, सायबरच्या ठाणेदार सीमा दाताळकर ही मंडळी देखील पोहोचली. ठाण्याच्या आत-बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
आमदार राणांचे नाव सांगा, यासाठी कोठडीतील ‘त्या’ चौघांवर प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्यांना एखाद्या आतंकवाद्यापेक्षा अमानुष वागणूक दिली जात आहे. तशी तक्रार माझ्याकडे आली. सबब, लोकप्रतिनिधी म्हणून त्या निरपराधांना मला भेटायचे होते, ती भेट पोलिसांनी नाकारली. याबाबत लोकपाल व मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहे. खाकीतील काही लोक देखील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडले आहेत.
नवनीत राणा, खासदार अमरावती