कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांची मर्यादा, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मिळेल लाभ
अमरावती : राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये, अशी अट लादण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ या वर्षात याेजनेचा लाभ घेता येणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्ती योजनेतून १० मुला-मुलींना लाभ मिळणार आहे. एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. ही योजना १० विद्यार्थ्यांसाठी असून, त्यापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास विद्यार्थ्याने दहावी, बारावी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांच्या आधारे प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, पांढरकवडा, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद या प्रकल्प कार्यालयांमध्ये अर्ज सादर करता येईल, असे अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी कळविले आहे.
------------
या अभ्यासक्रमासाठी मिळेल शिष्यवृत्ती
एम.बी.ए. (पदव्युत्तर) दोन जागा, वैद्यकीय अभ्यासक्रम (पदवी, पदव्युत्तर) दोन जागा, बी.टेक इंजिनीअरिंग (पदवी, पदव्युत्तर) दोन जागा, विज्ञान (पदवी, पदव्युत्तर) एक जागा, कृषी (पदवी, पदव्युत्तर) एक जागा, इतर विषयांचे अभ्यासक्रम (पदवी, पदव्युत्तर) एक जागा