अमरावती : जिल्ह्यात जेमतेम सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये ‘लॉकडाऊन’मुळे पुन्हा बंद करावे लागले. ऑनलाईन शिक्षणाचाही बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असतील.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २१ फेब्रुवारी रोजी अमरावती महापालिका व अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात लॉकडाऊन घोषित केले. या आदेशात सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी, कोचिंग क्लासेस बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी सुरू झालेल्या नववी ते बारावी आणि पाचवी ते आठवीच्या शाळा सोमवारपासून ओस पडल्या आहेत. ‘लॉकडाऊन’ सुरू होताच शाळांमध्ये अध्यापनाने कार्य बंद पडले. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी परीक्षा कशा होतील, अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, याची चिंता सतावू लागली आहे.
दरम्यान, कोरोना लाटेमुळे चिंतातुर शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन’ अचलपूर, अमरावती शहराच्या क्षेत्रात लागू झाला असला तरी शाळा, महाविद्यालये जिल्हाभरात बंद असल्याचे चित्र आहे.
--------------------------
जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांची संख्या
महाविद्यालये - ११८
पाचवी ते आठवीच्या शाळा- १९९४
नववी ते बारावीच्या शाळा- ७४९
पहिली ते चौथीपर्यंत शाळा- १२२६
-------------------
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार १ मार्चपर्यत शाळा, महाविद्यालये बंद असून, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशैक्षणिक कामांसाठी शाळा सुरू ठेवण्यात येत आहेत. पुढील आदेशानंतरच शाळा सुरू होतील.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.
-