अतिवृष्टीचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:00+5:302021-02-06T04:22:00+5:30
चांदूर रेल्वे : ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कोटी ७६ ...
चांदूर रेल्वे : ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कोटी ७६ लाख रुपयांचा दुसरा टप्पा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यात सोयाबीन, उडीद, मूग या जिरायती व संत्रा या बागायती पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील एकूण २९ हजार शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे.
हातातोंडाशी आलेले पीक पावसाने खराब केले. सोयाबीन, उडीद, मूग या नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी विवंचनेत पडला होता. लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पाठपुरावा केला. त्यावरून हेक्टरी १० हजार रुपये मदत सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना, तर संत्र्यासाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यात दोन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांना मिळत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात २९ हजार शेतकरी असून, त्यात २८ हजार कोरडवाहू आणि १ हजार बागायती शेतकरी असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.