परतवाडा : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता हॉटस्पाट बनलेल्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरातील चार क्षेत्रात आणि देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत तीन क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकूम आदेश लागू करण्यात आला आहे.
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी २० फेब्रुवारी रोजी याबाबत आदेश काढले. १४४ कलमासोबतच प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. अचलपूूरचे तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि परतवाडाचे ठाणेदारांनी प्रस्तावित केल्यानुसार परतवाडा शहरातील सदरबाजार, पिंपळकर मार्ग, श्रीनिवास मार्ग, गुरुनानक नगर परिसरात कंटेनमेंट झोन लावण्यात आले आहेत. अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व देवमाळी ग्रामपंचायतीच्या सचिवांनी प्रस्तावित केल्यानुसार देवमाळी क्षेत्रातील संभाजीनगर, रुख्मीणीनगर, श्रीराम नगरमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असल्याचे अचलपूर एसडीओंच्या आदेशात नमूद आहे. या कंटेनमेंन्ट झोनमधून कुठल्याही व्यक्तीला बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तीस आत येण्यास मनाई केली आहे.