‘ती‘ स्फोटके विहीर ब्लास्टिंगसाठीचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:13 AM2021-03-21T04:13:48+5:302021-03-21T04:13:48+5:30
तिवसा : शहराच्या पंचवटी चौकात जिलेटिन व स्फोटक आढळल्याने शुक्रवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ती स्फोटके विहिरी ...
तिवसा : शहराच्या पंचवटी चौकात जिलेटिन व स्फोटक आढळल्याने शुक्रवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ती स्फोटके विहिरी खोदताना करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणार होते. या निष्कर्षाप्रत तिवसा पोलीस पोहोचले आहे. पोलिसांनी घातपात वा अन्य हिंसक घटनेची शक्यता फेटाळली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी अंकुश लांडगे व कमलेश दापूरकर (दोन्ही रा.करजगाव) यांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गावातून अटक केली.
तत्पूर्वी गुरुवारी रात्री सातरगाव येथील सुमित सोनोने या युवकाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालायाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती स्फोटके केवळ विहीर ब्लास्टिंग कामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. विहिरीच्या खोदकामाकरिता वापरण्यात येत असलेल्या जिलेटिन स्फोटकांची खरेदी व व्यवहार सोनोने याने केला होता. तिवसा येथून ती स्फोटके घेऊन जात असतानाच गुरुवारी रात्रीच्या वेळी पंचवटी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना पाहून तो पळाला. पडताळणी अंती यात अंकुश मोहन लांडगे व कमलेश नंदकिशोर दापूरकर हे सोनोनेकडून ती स्फोटके खरेदी करून घेऊन जात होते. त्यामुळे या दोघांनाही तिवसा पोलिसांनी गावातून अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.