अमरावती : कोरोना संर्सगाचे काळात कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हीअर ॲक्यूट रेस्पिरेटरी ईलनेस) आजाराचे तब्बल २,१२८ रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत. यापैकी ४१३ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला व यात १६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सारी आजारानेही २५० वर रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण कोरोनाच्या डेथ रेटच्या १० पट अधिक आहे.
सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे या आजारावर आरोग्य यंत्रणेद्वारा विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देशदेखील आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘सारी रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड व स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वार्ड व येथील पीडीएमसी रुग्णालयात दोन वार्डात सारीच्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत सारीच्या १,९९८ रुग्णांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सारीच्या उपचारादरम्यान २५० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे १८,५९५ रुग्ण असताना ३८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मात्र, सारीमध्ये दोन हजार रुग्णसंख्येत २५० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्ह्यातील वास्तव आहे. जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या ३१ दिवसांत सारीच्या तब्बल ७७५ रुग्णांची नोंद झालेली आहे. सध्या सारीचे रुग्ण कमी निष्पन्न होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
बॉक्स
सारीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड
जिल्ह्यात अधिक प्रमाणात सारीचे रुग्ण नोंद होत असल्याने कोरोना संसर्गाचे सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र दोन वार्डांची व्यवस्था करण्यात आली व रुग्णसंख्या वाढताच पुन्हा एक वार्ड सुरू करण्यात आला. याशिवाय पीडीएमसीतदेखील सारी आजारासाठी दोन वार्ड तयार करण्यात आले. या वार्डसाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी व वार्डात ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटरची सुविधा करण्यात आलेली आहे.
कोट
सध्या सारीचे रुग्ण कमी येत आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण जास्त होते. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वार्ड व पीडीएमसी दोन वार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णांची कोरोना चाचनी करण्यात येते. यामध्ये ४१३ नमुने पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
बॉक्स
महिन्यानुसार रुग्णसंख्या (प्रोग्रेसिव्ह)
एप्रिल -३३
मे -६३
जुन १२८
जुलौ २८५
ऑगस्ट ९२१
सप्टेंबर १६९६
ऑक्टोबर १९६६
नोव्हेंबर २१२८
पॉइंटर
सध्या उपचार सुरू असलेले सारीचे रुग्ण ३६
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण ७७५