अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ३३४ वीज ग्राहकांना सध्या मीटरच्या तुटवड्यामुळे अंधारात दिवस काढावे लागत आहेत. मीटरअभावी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची वीज जोडणी प्रलंबित आहे.
थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक अरिष्टात सापडली असताना, आता वीज मीटरच्या तुटवड्याने महावितरणसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मीटर उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील शहरातील १२३७ आणि ग्रामीण भागातील ७७९ वीज जोडणी प्रलंबित आहेत. लॉकडाऊनमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी आंदोलन सुरू असल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महावितरणच्या साहित्य खरेदीवर त्याचा परिणाम होत आहे. आता वीज मीटर तुटवड्याच्या रूपाने हे स्पष्ट झाले. घरगुती ग्राहकांना तातडीने वीज कनेक्शन देण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वीज मीटरचा तुटवडा आहे. नवीन पद्धतीचे मीटर बसविण्यास महावितरणने सुरुवात केली असली तरी हे मीटर महागडे आहेत. महावितरणकडे शहर व ग्रामीण मिळून २३३४ जणांनी नवीन वीज मीटरकरिता पैसे भरले आहेत. ग्राहकांना मोफत पुरविले जाणारे वीज मीटर उपलब्ध करण्यासाठी महावितरणने निविदा काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बॉक्स
२३३४ ग्राहक ‘वेटिंग’वर
उपविभाग ग्राहक
अमरावती शहर १२३४
अमरावती ग्रामीण ४९०
अचलपूर ४१६
मोर्शी १९१
------------------------
यातून होणार वीज जोडणी
कनेक्शन पोल - ५५५
इन्फ्रास्ट्रक्चर - ७७९