अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त ९५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांद्वारा पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारणे अंगलट येणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारा कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासाच्या आत खुलासा मागविला आहे.
निवडणुकीसाठी किमान १३ हजार मनुष्यबळ आवश्यक आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर मतदान प्रक्रियेचा डोलारा आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी २३ व २४ मार्च रोजी या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर पार पडले.
त्यापूर्वी या सर्वांना निवडणूक कर्तव्याची नियुक्तिपत्रे पाठविण्यात आली व त्यामध्ये प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली होती. प्रत्यक्षात १३,३०९ पैकी १२,३५५ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थिती लावली. त्यामुळे पहिल्याच प्रशिक्षणाला तब्बल ९५४ जण अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.