खासगी डेअरीला कोट्यवधींच्या ‘ओपन स्पेस’चे श्रीखंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:39 PM2017-12-21T23:39:05+5:302017-12-21T23:39:23+5:30
‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत एका खासगी दूध डेअरीला शहरातील १४ मोकळ्या जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत एका खासगी दूध डेअरीला शहरातील १४ मोकळ्या जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या वेळेवरच्या प्रस्तावाला आमसभेची गुपचूप मान्यता मिळविण्यात ‘झारीतील शुक्राचार्य’ यशस्वी झाले आहेत. नोएडास्थित मदर फ्रुट अॅन्ड व्हेजिटेबल प्रा.लिमिटेड या खासगी दूध डेअरीला शहरातील २८ जागा द्याव्यात, असे निर्देश दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगत प्रशासनाने तत्परतेने या जागा मंजूर करून घेतल्या. त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय अनियमिततेचे लाभार्थी कोण, याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली आहे.
भाजप सरकार राज्यात सत्ताधीश झाल्यापासून स्थानिक स्तरावर घेण्यात येत असलेले अनेक निर्णय थेट मंत्रालयस्तरावरून होऊ लागले आहे. कंत्राट वा कामांचे मंत्रालयस्तरावर होत असलेले ‘सेंट्रलायझेशन’ यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राष्टÑीय दुग्ध विकास मंडळ संचालित मदर फ्रुट अॅन्ड व्हेजिटेबल प्रा.लिमिटेड या खासगी दूध डेअरीला मिल्क बुथ लावण्याकरिता शहरात १४ ठिकाणी परवानगी देण्याबाबत प्रस्ताव एडीटीपीकडून ठेवण्यात आला. १९ डिसेंबर रोजी झालेल्या आमसभेत वेळेवर आलेल्या या प्रशासकीय प्रस्तावावर घणाघाती चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून या प्रस्तावाला जोरकस विरोध झाला. अपंगांना स्टॉल देण्यास अटी-शर्तींचे पालूपद लावण्यात येते. मात्र, या प्रकरणात एडीटीपीने तत्परता दाखवत अवघ्या दहा दिवसांत जागा शोधून त्या निश्चित करून आमसभेत समोर आणले. त्यावर आक्षेप नोंदविण्यात आले. तूर्तास या ५ बाय ५ मीटर आकाराच्या १४ जागा ११ महिन्यांसाठी मदर डेअरीला देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काँग्रसचे नगरसेवक प्रशांत डवरे, नीलिमा काळे, सलिम बेग, बसपचे चेतन पवार, भाजपचे अजय गोंडाणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पीठासीन सभापती संजय नरवणे यांनी प्रस्तावाला स्थगिती दिली. तशी नोंद नगरसचिव विभागाने घेतली. मात्र, मध्यान्यानंतर आश्चर्यकारकरीत्या स्थगित करण्यात आलेला हा विषय स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने चर्चेत आला. त्याला अचानक मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सर्र्वाचेच कान टवकारले. जो विषय पीठासीन सभापतींनी स्थगित ठेवला त्याच विषयाची केवळ तोंडी माहिती देऊन तो प्रस्ताव कसा काय मंजूर केला जातो, यावर सभागृहाच्या ज्येष्ठ सदस्यांनी आक्षेप घेतला. या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रशांत डवरे आक्रमक झाले. त्यांनी याबाबत महापौर, आयुक्तांसह नगरविकास विभागाकडे तक्रार नोंदविली. या आठवड्यात हा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या जागेत मिल्क बुथ उभारण्याकरिता मदर फ्रुट अॅन्ड व्हेजिटेबल प्रा.लिमिटेड या खासगी दूध डेअरीला जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. त्यानुसार १४ जागा निश्चित करून तसा प्रस्ताव आमसभेत ठेवण्यात आला.
- सुरेंद्र कांबळे, सहायक संचालक, नगररचना, महापालिका