शुभमंगल योजनेचा शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 12:28 AM2016-02-28T00:28:58+5:302016-02-28T00:28:58+5:30

सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामध्ये अडकलेला शेतकरी नैराश्यातून मृत्यूला कवटाळतो.

Shubhamangal scheme for farmers | शुभमंगल योजनेचा शेतकऱ्यांना आधार

शुभमंगल योजनेचा शेतकऱ्यांना आधार

Next

शासनाचा हातभार : मुलीच्या नोंदणी विवाहासाठी मिळणार १० हजारांचे अनुदान
अमरावती : सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामध्ये अडकलेला शेतकरी नैराश्यातून मृत्यूला कवटाळतो. या निराशेच्या गर्तेतून सावरण्यासाठी शासनाने शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विवाह करणाऱ्या प्रतिजोडप्यास १० हजारांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.
मुलीच्या लग्नाचा बोजा शेतकरी परिवारावर पडू नये, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. सामूहिक विवाह सोहळ्याची वाट न पाहता थेट नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करता येणार आहे. मुलीच्या लग्नासाठी अनेकदा कर्ज काढले जाते व निसर्गाची साथ नसल्यास नापिकी होऊन कर्जाचा डोंगर वाढतो व यामुळे नैराष्य आलेला शेतकरी आत्महत्या करतो, ही वस्तुस्थिती आहे.
गरीब, गरजू शेतकरी, शेतमजूर यांच्यावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाने २००६ मध्ये विदर्भातील शेतकरी परिवारासाठी ही योजना सुरू केली होती. नंतर २००९ मध्ये राज्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये सुधारणा करून नवीन स्वरुपात शुभमंगल योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे वैयक्तिक स्वरुपाचा लाभ मिळणे शक्य झाले आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिनस्त ही योजना आहे. या विवाह योजनेत सहभागी होणाऱ्या अथवा सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्याला १० हजारांचे अर्थसहाय्य मिळणार आहेत. विवाहेच्छूक दाम्पत्य स्वत:हून केव्हाही जवळच्या नोंदणी कार्यालयात नोंदणी करू शकतो व अनुदानास पात्र घेऊ शकतो.

या योजनेची वैशिष्ट्ये
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागींना अनुदान मिळणार
असे सोहळे तालुका पातळीवर आयोजित करावे.
विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास १० हजारांचे अनुदान.
प्रतिजोडप्यामागे स्वयंसेवी संस्थेस २ हजारांचे अनुदान
लाभार्थी वधूचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.
अनुदान वधूच्या आईच्या खात्यावर जमा होईल.
एका संस्थेला वर्षात २ सामूहिक विवाह सोहळा आयोजित करता येईल.
सोहळ्यासाठी किमान ५ जास्तीत जास्त १०० दाम्पत्य.

कलापथक करणार जनजागृती
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाद्वारा वेळोवेळी उपाययोजना व जनजागृती करीत आहे. शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा माहिती केंद्राच्यावतीने गावपातळीवर कला पथकांची निवड करण्यात येऊन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती करणार आहे. या कलापथकातील कलावंत ग्रामीण भागात जाऊन पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिका, भजन-कीर्तन, गोंधळ व सप्तखंजेरीच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करणार आहेत.

Web Title: Shubhamangal scheme for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.