अचलपुरात एलईडी पथदिवे योजनेची ऐसीतैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:33+5:302021-02-16T04:14:33+5:30
अचलूपर : राज्य व केंद्र शासनाच्या एलईडी पथदिवे योजनेची अचलपूर शहरात मोठ्या प्रमाणात ऐसीतैसी होत आहे. ठेकेदारांवर अचलपूर ...
अचलूपर : राज्य व केंद्र शासनाच्या एलईडी पथदिवे योजनेची अचलपूर शहरात मोठ्या प्रमाणात ऐसीतैसी होत आहे. ठेकेदारांवर अचलपूर नगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने अचलपूरकरांना आठ-आठ दिवस रस्त्यावरून अंधारात ये-जा करावी लागत आहे. विजेची बचत होण्यासाठी लावलेले पथदिवे अचलपूर शहराकरिता पांढरा हत्ती ठरला आहे.
अचलूपर नगरपालिका क्षेत्रात एलईडी दिवे लावण्याचा करार राज्य सरकारशी करण्यात होता. एलईडी दिवे लावणे, देखरेख व दुरुस्ती असे कंत्राट ईसेल या कंपनीला देण्यात आले होते. नगर परिषदेच्या १३ किलोमीटरच्या हद्दीतील पाच हजारांच्या जवळपास ट्यूबलाईट, स्ट्रीटलाईट काढून त्या जागेवर १० हजारांच्या जवळपास ११०, ७०, ४५, ३५ व १८ वॅटचे एलईडी दिवे लावण्यात आले. मुख्य रस्त्यावर ७० वॅटचे, चौकात ११० वॅटचे, ट्यूबलाईटच्या जागी १८ वॅटचे एलईडी लागले.
नगरपालिका व कंपनी यांच्यामध्ये करारानुसार २४ तास एक पथदिवा बंद असल्याने आर्थिक दंड करण्यात येईल, असा करार झालेला आहे. तथापि, अचलपूर नगर परिषद हद्दीतील शेकडो एलईडी पथदिवे आठ-आठ दिवस बंद राहतात. नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. मात्र, कंत्राटदाराला दुरुस्तीबाबत नगर परिषदेने सुचविले नाही वा दंडही ठोठावला नाही.
-----------
काही ठिकाणी डायरेक्ट
वीजवापर कमी व्हावा, या उद्देशाने लावण्यात आलेल्या एलईडी पथदिव्यांमुळे जास्त वीज खर्च होत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी खांबावरील वीजवाहिनीशी एलईडी दिवे थेट जोडण्यात आले आहेत. त्यामुळे ते दिवसाउजेडीही सुरू असतात.
-------------
दोघांवर दुरुस्तीची जबाबदारी
कंत्राटदाराने एलईडी पथदिवे दुरुस्तीकरिता केवळ दोनच माणसे ठेवली आहेत. त्यांना बंद असलेले पथदिवे दाखविण्याकरिता नगर परिषदेची चार माणसे जातात. मनुष्यबळाचा तुटवडा नागरिकांना रात्रीच्या अंधाराच्या रूपाने सोसावा लागत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.