लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह सहा जणांना मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. ही कारवाई सीपींचे विशेष पथक, शहर गुन्हे शाखा व एफडीएने संयुक्तपणे केली. आरोपींकडून विविध कंपनींचे १० रेमडेसिविर, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल असा एकूण १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीसूत्रानुसार, शुभम कुमोद सोनटक्के (२४, रा. ठाकूर निवास चपराशीपुरा), शुभम शंकर किल्हेकर(२४, रा. धोबीनाला वडाळी), डॉ. अक्षय मधुकर राठोड (२४, रा. कार्टन नंबर ४ भातकुली रुग्णालय, पूनम भीमराव सोनोने (२६, रा. भेडगाव ता. बार्शीटाकळी जि. अकोला, ह.मु. अमरावती),
अनिल गजानन पिंजरकर(३८, रा. सर्वोदय कॉलनी काँग्रेसनगर), डॉ. पवन दत्तात्र्य मालुसरे (३५, रा. कॅम्प रोड फ्रेजरपुरा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात कलम ४२०, १८८, ३४ व औषधी प्रशासनाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, पीएसआय राजकिरण येवले, विशेष पथकाचे एपीआय पंकज चक्रे व पथकाने केली
बनावट ग्राहक पाठवून अशी केली कारवाई
सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील एक अटेडन्ट रेमडेसिविरचा काळाबाजार करून त्याची चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळताच एक पोलीस कर्मचारी बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आला. तसेच एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांचे पथक व पंचासह कॅम्प कार्नर येथून बनावट ग्राहक यांच्या मोबाईलवरून आरोपीशी संपर्क साधण्यात आला. ६०० रुपये मूळ किंमत असलेले रेमडेसिविरचा १२ हजारांत देण्याचे ठरले. त्यानुसार ग्राहकाने डिल केली असता, खात्री पटल्यांतर चढ्या दराने विक्री करणारा आरोपी कोविड रुग्णालयातील अटेन्डंट शुभम सोनटक्के
व डफरीन मार्गावरील महावीर हॉस्पिटलमध्ये अटेन्डन्ट म्हणून कार्यरत असलेला शुभम किल्हेकरला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर व दोन दुचाकी पथकाने जप्त केल्या. त्यांना इंजेक्शन कुठून आणले, असे विचारले असता, ते इंनजेक्शन डॉक्टर अक्षय राठोड यांच्याकडून मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्याला पथकाने भातकुली पीएचसीतून ताब्यात घेतले. त्याच्या चारचाकी वाहनातून एक रेमडेसिविर जप्त केले. त्याला पथकाने बोलते केले असता, इर्विन रुग्णालयातील स्टाफ नर्स पूनम सोनोने हिचे नाव समोर आले. तिला महिला पोलीस भारती ठाकूर यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता, तिच्या ताब्यातून एक रेमडेसिविर जप्त केले. तिला सुद्धा पोलिसानी बोलते केले असता, तिने सदर इंजेक्शन संजिवनी कोविड हेल्थ सेंटर येथील डॉक्टर व टेक्निशियन हे रेमडेसिविर पुरवीत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर लॅब असिस्टंट अनिल पिंजरकर, डॉ. पवन मालुसरे याच्याकडून पाच रेमिडेसिविर चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून जप्त करण्यात आले. सदर आरोपी तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत विविध कंपनींची १ लाख २० हजार रुपये किमतीची १० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. तसेच एक लाख १० हजारांच्या दोन दुचाकी तसेच १२ लाखांच्या दोन चारचाकीसह एकूण १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
सहा आरोपींची कोरोना चाचणी केली असता, त्यातील एक पुरुष आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पाच आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली.
रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मागावर पथक एक महिन्यापासून होते. अखेर त्यांना पकडण्यात यश आले. अधिक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
- आरती सिंह,
पोलीस आयुक्त, अमरावती