समृद्धी महामार्गाच्या कामात मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:40 AM2019-06-01T01:40:01+5:302019-06-01T01:40:24+5:30
‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामावर परिसरातीलच मातीमिश्रित मुरूम वापरला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाला लागणारा मुरूम आणि इतर साहित्याकरिता शासनाने रॉयल्टी माफ केली आहे.
मनीष कहाते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा रामनाथ : ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामावर परिसरातीलच मातीमिश्रित मुरूम वापरला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामाला लागणारा मुरूम आणि इतर साहित्याकरिता शासनाने रॉयल्टी माफ केली आहे. त्याचाच फायदा घेऊन संबंधित कंत्राटदार उपलब्ध असेल तेथून मुरूम आणि गिट्टी जशाच्या तशाच स्थितीत ट्रकने आणून रस्त्यावर टाकत आहे. त्यामुळे रस्त्याचा महत्त्वाचा पायाच निकृष्ट बांधकामाने कमकुवत होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्याकडे महाराष्टÑ रस्ते विकास मंडळाने ‘चौकशी करू’ असे म्हणत बोळवण केली आहे.
महामार्गावर मुरूम सपाटीकरण केल्यानंतर पाणी टाकायलाच हवे. तथापि, येथे पाण्यासाठी केवळ एकच टँकर आहे. त्यामुळे रस्त्यावर योग्य प्रमाणात पाणी टाकले जात नाही. त्यामुळे दबाई केली की, तात्काळ मुरूम उखडत आहे. काही ठिकाणी शेतातील मातीवरच मुरुमाचे ढिगारे टाकून मशीनच्या साहाय्याने सपाटीकरण केले जात आहे. येथील संपूर्ण जमीन काळी असल्याने मुरुम टाकल्याबरोबर लगेच दबतो. त्यामुळे पुढे हा मार्ग अवजड वाहनांचा कितपत भार सहन करेल, हा प्रश्नच आहे.
महामार्गाच्या कामाकरिता मुरूम, दगड प्रचंड प्रमाणात लागत आहे. संबंधित कंत्राटदार शेतातील मुरूम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करीत आहे. मुरुमाची वाहतूक वाढोणा ते धानोरा रस्त्यावर ट्रकने होते. हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. गणेशपूर सिंचन प्रकल्पामध्ये जेसीबीने खोदून मुरूमाचे ट्रक भरधाव वेगात रस्त्याने जात असल्याने आपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महामार्गाच्या रस्त्यावर मातीमिश्रित मुरूमाचे ढिगारे उभे आहेत. त्या मुरूमाखाली झाडे दबली आहेत. रस्त जमिनीपासून चार ते पाच मीटर उंच होणार आहे. एकूण सहा प्रकारचे साहित्य वापरून महामार्गाची उंची वाढविली जाणार आहे.
मुरूमामध्ये माती येणारच. मातीशिवाय मुरूम तयार होत नाही. संपूर्ण महामार्गात मातीचा मुरूम टाकण्यात येत आहे. माती नसलेला मुरूम आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विशाल कटारे, ज्यु.इंजि., एनसीसी कंपनी, समृद्धी महामार्ग
तालुक्यातील सर्वच सिंचन प्रकल्प, तलाव, बंधाऱ्यांमधून मुरूम काढला जाऊ शकतो. त्याची परवानगी जिल्हाधिकारी देतात. त्यांना रॉयल्टी माफ आहे. तसा शासनाचा अध्यादेश आहे.
- एम.एस. जोरवार,
नांदगाव खंडेश्वर
मुरूमामध्ये माती कशी आहे, मातीची गुणवत्ता काय आहे, हे ठरवावे. माती वापरण्यायोग्य असेल तर काहीच हरकत नाही. मातीमिश्रित मुरूम प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच वापरण्यात येते. माती असेल तर मी प्रत्यक्ष जाऊन चौकशी करते.
- संगीता जयस्वाल, अधीक्षक अभियंता,
महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळ
(समृद्धी महामार्ग, अमरावती)