जागा परस्पर लाटली; गावकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:07+5:302021-01-02T04:11:07+5:30
पान २ चे सेकंड लिड नेरपिंगळाई, मोर्शी : तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील भागवत किसनराव इंगोले व गावकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ...
पान २ चे सेकंड लिड
नेरपिंगळाई, मोर्शी : तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील भागवत किसनराव इंगोले व गावकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी सात जणांविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१, १२० ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शीतल अविनाश कडू (३०), मधुकर दत्तुजी सावरकर (७०), मनोज मधुकर सावरकर (३५), मालू मधुकर सावरकर (६०), सपना मधुकर सावरकर (३०), अविनाश नामदेवराव कडू (४०), सरिता संतोष सुळे (४०, सर्व रा. तळेगाव दाभेरी) यांचा समावेश आहे. भागवत किसनराव इंगोले (७०) यांच्या तक्रारीनुसार, सातही आरोपींनी संगनमताने खोटे व बनावटी कागदपत्र तयार केले. त्याचप्रमाणे सरपंचपदाचा गैरवापर करून व खोट्या स्वाक्षरी करून इंगोले व अन्य गावकऱ्यांची फसवणूक केली. ३० डिसेंबरपुर्वी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस सुत्रानुंसार, शीतल अविनाश कडू या तळेगाव दाभेरी येथील सरपंच असताना त्यांनी पती, ग्रामपंचायत सदस्य व अन्य जणांना सोबत घेऊन गावातील १५०० फुट खुली जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:च्या नावे करवून घेतली. ती जागा शासकीय वा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचा दावा फिर्यादी भागवत इंगोले यांनी केला होता. मात्र, त्याला न जुमानता व सरपंचपदाचा गैरवापर करून आरोपींनी त्या जागेचे बनावट कागदपत्र बनविले. त्या माध्यमातून गावकऱ्यांचीही फसवणूक करण्यात आली. यातील एक आरोपी महिलादेखील ग्रामपंचायत सदस्य होती, अशी माहिती शिरखेड पोलिसांनी दिली.
---