अमरावती : वेलकम पॉईंटस्थित एका झुनका भाकर केंद्रातून चक्क गांजा विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाच्या कारवाईत उघड झाला. विशेष पथकाने २१ मे रोजी रात्री वेलकम टी-पॉईंट येथील एका झुनका भाकर केंद्रावर धाड टाकून तब्बल १० किलो ८५५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अविनाश रामकृष्ण डकरे (५४) रा. योगीराजनगर, रहाटगाव असे अटक आरोपीचे नाव आहे.
अविनाशचे वेलकम टी-पॉईंट येथे वैष्णवी झुनका भाकर केंद्र आहे. या झुनका भाकर केंद्राआडून अविनाश हा गांजाची विक्री करीत होता. याबाबत पोलीस आयुक्तांच्या पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने रविवारी रात्री ११.१० च्या सुमारास या झुनका भाकर केंद्रावर धाड टाकली. झडतीत झुनका भाकर केंद्रामध्ये कापडी पिशव्यांमध्ये १ लाख ३० हजार रुपयांचा १० किलो ८५५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार पथकाने अविनाशला अटक करून गांजा, मोबाइल व रोख असा एकूण १ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
या प्रकरणी अविनाशविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर, विनय मोहोड, जहीर शेख, अतुल संभे, विनोद काटकर, सागर ठाकरे यांनी ही कारवाई केली.
जुनी वस्तीतून चिलम जप्त
जुनी वस्ती बडनेरा येथील अलमास गेट भागातून अशोक चांदेकर (रा. बारीपुरा) याच्याकडून गांजा असलेली चिलम, रिकामे प्लास्टिक पाऊच, एक माचिस असे गांजा पिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष पथकाचे माजी प्रमुख तथा गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी २० मे रोजी दुपारी ही कारवाई केली. त्याच्याविरूद्ध बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल केला.