मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण मुद्द्यावरुन शिवसेनेविरुद्ध आंदोलन पुकारले होते. मुंबईती मातोश्री या निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. त्यावेळी, झालेल्या आंदोलनानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, शिवसेना विरुद्ध राणा असा वाद महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर, महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता, खासदार राणा यांनी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. त्यावरुन, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानुसार, २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवरुन ही रेल्वेगाडी सुटली आहे. दुसऱ्यादिवशी २७ जानेवारी रोजी सकाळी ६,४५ वाजता अजमेरपासून ५ किमी दूरवर असलेल्या दौजाई स्टेशनवर पोहोणार आहे.
ख्वाजा गरीब नवाज यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना आरामादायी प्रवास घडावा, या हेतुने खासदार राणा यांनी ही मागणी केली होती. त्यास, रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली असून आज ही गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, अजमेरहून परत येण्यासाठी २९ जानेवारी रोजी रात्री ७ वाजता दौजाई रेल्वे स्टेशनवरुन गाडी असणार आहे. जी गाडी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१० वाजता अमरावती मॉडेल स्टेशनवर पोहोचणार आहे.
दरम्यान, खासदार राणा यांच्या या मागणीपत्रावरुन शिवसेना खासदार मनिषा कायंदे यांनी ट्विटरवरुन राणा यांच्यावर निशाणा साधला. आहे. राणा यांच्या मागणीचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत, जय हनुमान ज्ञान गुण सागर... जय कपीस तिहु लोक उजागर..... असे म्हणत उपरोधात्मक टोला राणा यांना लगावला आहे.