ग्रामपंचायत पुढाकार; लसीकरण रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन
अंजनगाव सुर्जी : कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी निमखेडबाजार ग्रामपंचायतीचे सरपंच विपीन अनोकार यांनी पुढाकार घेत सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गावात सॅनिटायझरची फवारणी केली. सध्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली.
कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात १२ मे रोजी सभा घेण्यात आली. या सभेनंतर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच विपीन अनोकार व सर्व सदस्य यांनी गावात फिरून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विनोद टेकाडे यांच्या सहकार्याने पूर्ण गाव सॅनिटाईज करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य कुलदीप पवार, ग्रामसेवक सुनील देशमुख, तलाठी रंजना गावंडे, पोलीस पाटील दिनेश तनपुरे, आरोग्य सेवक सपकाळ, तलाठी चिंचोना रमाकांत मुंडे, कोतवाल, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.