अन् एसटी प्रवाशांचा बांध फुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:13 PM2018-02-26T22:13:30+5:302018-02-26T22:13:30+5:30
यवतमाळकडे जाणाऱ्या सर्वसाधारण लाल बस उशिरा सोडण्यात आल्याने रविवारी सायंकाळी प्रवाशांचा रोष उफाळून आला होता.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यवतमाळकडे जाणाऱ्या सर्वसाधारण लाल बस उशिरा सोडण्यात आल्याने रविवारी सायंकाळी प्रवाशांचा रोष उफाळून आला होता. शिवशाही बसचे महागडे भाडे न परवडणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक परिसरात चक्काजाम केल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. प्रवाशांच्या संतापामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनाही पाचारण करावे लागले.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज हजारांवर बस ये-जा करतात. त्यातच आता शिवशाही बसची भर पडली आहे. सध्या लग्नासराईमुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.
प्रासंगिक करारामुळे प्रवासी वेठीस
यवतमाळ येथे जाण्यासाठी प्रवासी रविवारी लाल बसची प्रतीक्षा करीत होते. दुपारनंतर यवतमाळकडे केवळ शिवशाही बसच पाठविण्यात येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. शिवशाहीचे तिकीट दर अधिक असल्यामुळे बहुतांश प्रवासी हे लाल बसची प्रतीक्षा करीत होते. दुपारची सायंकाळ झाली; मात्र लाल बस न सोडता केवळ यवतमाळ जाणाºया शिवशाहीच सोडल्या जात असल्याचा प्रकार बघून प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. प्रवाशांनी एकत्र येऊन विचारले तेव्हा त्यांना शिवशाहीत जाण्याचा सल्ला मिळाला. यामुळे सुमारे २०० ते ३०० प्रवाशांनी बसस्थानकात येणाºया सर्व गाड्या अडवून धरल्या. यामुळे अन्य वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवाशांच्या प्रचंड कल्लोळात रस्त्यावरील हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने चांगलाच गोंधळ उडाला. घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी पाचारण केले. वाहतूक पोलिसांची तर चांगलीच दमछाक झाली. हा प्रकार बघून एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बसस्थानकावर पोहोचले. त्यांनी प्रासंगकि कराराची अडचण सांगितली आणि प्रवाशांची समजूत काढून लाल बस उपलब्ध केल्या. यानंतर वातावरण निवळल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिय्या यांनी दिली.