अमरावती : राज्य महिला आयोगाने अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी आठ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी नोटीशीद्धारे स्पष्ट केले आहे.
दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी राज्य शासन गंभीर असून, प्रथमत: उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला आरोपी करण्यात आले. दीपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चारपानी सुसाईड नाेटमध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी याच्या नावाचा उल्लेख केला आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी संघटनांनी रेड्डी यांना आरोपी करण्याची मागणी रेटून धरली आहे. त्याअनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी मंगळवारी हरी बालाजी एन. आणि एम.एस. रेड्डी यांना नोटीस बजावताना दीपाली यांचे सुसाईड नोट, वृत्तपत्रांचे कात्रण सोबत जोडले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना आठ दिवसांत म्हणणे मांडावे लागणार आहे. व्यक्तिश: नोटीस बजावल्यामुळे दीपाली आत्महत्येप्रकरणी महिला आयोगाने रेड्डी यांना आरोपी बनविण्याची तयारी चालविल्याचे वास्तव आहे.
---------------
राज्याचे पोलीस महासंचालकांनी माहिती जाणून घेतली
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्याकडून दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेतली. याप्रकरणी आतापर्यंत अटकेतील आरोपी आणि लोकभावना आदींविषयी संवाद साधला. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी पूर्ण केली. त्यानुसार बुधवारी रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश वनमंत्र्यातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
------------
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी दोषींना कठोर शासन व्हावे, यासाठी राज्य महिला आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एसपी, एपीसीसीएफ यांना व्यक्तिश: नाेटीस बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा दीपाली यांना न्याय देण्यासाठी पावले उचलली आहे.
- यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री