अभिनव कॉलनीतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:27 PM2019-02-19T22:27:18+5:302019-02-19T22:28:03+5:30
अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी पोलिसांना आव्हान उभे केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी पोलिसांना आव्हान उभे केले आहे.
अभिनव कॉलनीतील रहिवासी शोभा सुभाष पुरी यांच्याकडे वरच्या मजल्यावर भाड्याने राहणारे संजय वर्मा हे पत्नी व मुलीला घेऊन १७ फेबु्रवारी रोजी सायंकाळी लोणी टाकळी स्थित फुलआमला येथे सासरी मदन महाराज यात्रेकरिता गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांना शेजाऱ्याने फोनवरून घरी चोरी झाल्याचे कळविले. त्यांनी तात्काळ अमरावती गाठून या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी घराच्या दाराचे कुलूप तोडून चोर घरात शिरल्याचे निदर्शनास आले. चोरांनी आलमारीच्या लॉकरचे तोडून त्यातील ९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १ लाख ७५ हजारांची रोख लंपास केली. ते मुलीच्या लग्नासाठी रकमेची जुळवाजुळव करीत असताना चोरट्यांना त्यांना हिसका दिला.
श्रीरामनगरातही घरफोडी
श्रीरामनगरातील रहिवासी पुंडलिक शंभुराव डकरे (६१) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीचा ऐवज व रोख असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्याकडे नोंदविली आहे.
घरमालकाच्या खिडकीचे ग्रिल तोडण्याचा प्रयत्न
शोभा पुरी यांचे दोनमजली घर आहे. तळमजल्यावर त्या स्वत:, तर वरच्या मजल्यावर संजय वर्मा राहतात. चोरांनी पुरी यांच्या खिडकीचे ग्रिल तोडण्याचे प्रयत्न केले. ग्रिलची एक सळाख त्यांनी तोडली. मात्र, अन्य लोखंडी बार चोरांकडून तुटले नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर चोरांनी संजय वर्मा यांच्या घरात शिरण्यासाठी पायऱ्याजवळ लागलेले चॅनल गेटचे कुलूप तोडले आणि पायऱ्यावरून वर चढल्यानंतर दाराचे कुलूप तोडल्याचे आढळून आले आहे.
कार घेऊन आले होते चोर
श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान वर्मा यांच्या घरापासून शंभर फुटांपर्यंत गेला. त्या ठिकाणी एका कारच्या टायरचे निशाण आढळून आले. त्यामुळे चोर हे कारने आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.