दर्यापूर : गेल्या वर्षापासून घरकूल लाभार्थ्यांच्या प्रलंबीत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता रोको केल्याने प्रशासकिय यंत्रणेची भंबेरी उडाली. भारीप-बमसं च्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात काहींनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तो हाणून पाडल्याने अनर्थ टळला आहे. प्रजासत्ताक दिनी दुपारी दोन वाजेपर्यंत दर्यापूर- अकोला मार्गावर सामदा गावानजीक शेकडो महिला व पुरुषांनी रास्ता आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करुन घरकुलाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाबाबत भारीप-बमस च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना पूर्वीच सूचना तसेच निवेदन दिले होते. त्यामुळे सकाळपासून सामदा गावाजवळ तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.घरकुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देवूनही त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे चौरपगार यांनी सांगितले. आंदोलनात भारीप बमसचे सदानंद नाग, अशोक नवलकार, अतूल नळकांडे, नितीन धूराटे व भिमराव खेर या नेत्यांना पोलिसांनी अगोदरच स्थानबंद केले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रभाकर चौरपगार भूमीगत झाले होते. परंतु तरीही सामदा कासमपूर, जहानपूर, पेठईतबारपूर व आसपासच्या ग्रामस्थांनी आंदोलन पूर्ण केले. घरकुल समधात मागणी करणाऱ्या अनेकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. येवदा पोलीसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)
सामदा मार्गावर पाच तास रास्ता रोको
By admin | Published: January 27, 2015 11:25 PM