आंदोलकांचा वसंत हॉलसमोरही रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:39 PM2018-06-04T22:39:12+5:302018-06-04T22:39:12+5:30
आंदोलनस्थळाहून पोलीस सभागृह असलेल्या वसंत हॉलमध्ये हलविलेल्या काँग्रेसजनांनी तेथेही अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना जखमी झालेल्या सागर कलाने नामक तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांच्या मारहाणीत आंदोलनकर्ता जखमी झाल्याचा आरोप काँगे्रस कार्यकर्त्यांनी केला.
अमरावती : आंदोलनस्थळाहून पोलीस सभागृह असलेल्या वसंत हॉलमध्ये हलविलेल्या काँग्रेसजनांनी तेथेही अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना जखमी झालेल्या सागर कलाने नामक तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांच्या मारहाणीत आंदोलनकर्ता जखमी झाल्याचा आरोप काँगे्रस कार्यकर्त्यांनी केला.
पोलिसांनी आ. वीरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर यांना ताब्यात घेतल्यावर आंदोलकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. आ. ठाकूर यांना पोलिसांनी पोलीस जीपमध्ये बसविले असता, आंदोलकांनी पोलिसांना मज्जाव केला. पोलीस वाहनातून आ. यशोमतींना बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले होते. एक आंदोलनकर्ता तर चक्क पोलिस वाहनांला लटकला होता. त्याला पोलिसांनी दूर सारले. त्यानंतर आ. यशोमती ठाकुर यांना पोलीस जीपमधून वसंत हॉल येथे नेण्यात आले. त्यापूर्वीच शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना तेथे आणले होते.
दोन आमदारांसह २०० कार्यकर्ते ‘डिटेन’
आंदोलनकर्त्यांची वसंत हॉलमध्ये एकच गर्दी झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात नारेबारी करीत प्रचंड रोष व्यक्त केला. काही आंदोलनकर्त्यांनी वसंत हॉल समोरील रस्त्यावरच रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील वाहनांसमोर झोपून शासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करीत वाहनाखाली शिरलेल्या आंदोलनकर्त्यांना खेचून बाहेर काढले. या ओढाताणीत सागर महादेव कलाने (३०,रा.तिवसा) नामक आंदोलनकर्त्यांला दुखापत झाली. तो बेशुद्ध झाला. काही कार्यकर्त्यांनी सागरला तत्काळ वसंत हॉलमध्ये नेऊन पाणी पाजले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून सागरला पोलीस जीपमध्ये टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँगे्रसने केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांच्यासह २०० कार्यकर्त्यांना 'डिटेन' केले. सर्व आंदोलनकर्त्यांना वसंत हॉल येथे नेण्यात आले होते.
आ. राणा पोहोचले, म्हणाले, पालकमंत्री नव्हे, ‘बालकमंत्री'
आ.यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांच्यासह दोनशेवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी 'डिटेन' करून वसंत हॉलला आणले. त्यावेळी आ. रवि राणा यांनी आ. ठाकूर व आ.जगताप यांची भेट घेऊन शेतकरी हितार्थ आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा केली. वसंत हॉल येथे आ. रवि राणा यांनी आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेंद्र जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे हे 'बालकमंत्री' आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांकडे गेले असता, त्यांना आंदोलन करण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी दिल्याचेही आ. राणा म्हणाले.
यशोमती ठाकूर, जगताप यांची इर्विनला धाव
आंदोलनकर्ता सागर कलाने जखमी झाल्याची माहिती मिळताच आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी इर्विन गाठले. जखमीची विचारपूस करून डॉक्टरांना उपचारासंदर्भात योग्य ते निर्देश दिले. संतप्त आंदोलक इर्विनसमोरच रास्ता रोको करणार होते. मात्र, कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी दोन्ही आमदारांना आंदोलन यशस्वी झाले, आता रास्तो रोको करू नका, अशी विनंती केली.
आत्मदहनाच्या प्रयत्नापूर्वी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आणि दोन आमदारांसह दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.