बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाईव्ह लोकेशन’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:51+5:302021-07-07T04:14:51+5:30
४७० बसगाड्यांना जीपीएस; एसटी महामंडळ हाेतेय हायटेक अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण ...
४७० बसगाड्यांना जीपीएस; एसटी महामंडळ हाेतेय हायटेक
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. एसटी प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक बसची लाईव्ह वेळ कळावी, यासाठी सर्व गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत बसण्याची वेळ आगामी काळात येणार नाही.
विभागांतर्गत अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर असे ८ आगार आहेत. आठही आगारातील ४७० बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आले आहे. राज्यातील गाव, वाड्या, वस्त्यांना जोडणारी एसटी ग्रामीण व शहरवासीयांच्या जीवनाशी निगडित आहे. प्रवास लांब पल्ल्याचा असो अथवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी एसटीलाच प्राधान्य देतात. मात्र, पुढची फेरी नेमकी किती वाजता येणार, याचा कोणताही अंदाज नसल्याने प्रवाशांची चांगलीच अडचण व्हायची. एसटीला उशीर झाल्यास बरेचदा प्रवासी पर्यायी व्यवस्थेचा उपयोग करायचे. यात एसटीला तोटा सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून एसटीने व्हीटीएस यंत्रणा बसमध्ये बसविली आणि ती मोबाइल अॅपशी जोडण्यात आली. या यंत्रणेमुळे रेल्वेप्रमाणेच आता एसटीच्या प्रवाशांनाही लाईव्ह माहिती उपलब्ध होत आहे. बस क्रमांकावरून लोकेशनही कळू लागले आहे. यामुळे शहरी ग्रामीण प्रवाशांची सोय झाली आहे.
गाडीची स्पीड अन लोकेशनही कळणार
व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममुळे अधिकाऱ्यांनाही बसवर ‘वॉच‘ ठेवणे एकाच ठिकाणावरून शक्य झाले आहे. बस सुटण्याची नेमकी वेळ, सध्या ती कुठे आहे, बसचा वेग (ओव्हर स्पीड), बस एकाच ठिकाणी किती वेळ उभी आहे, थांबा असूनही बस थांबली की नाही, बसचा पुढील थांबा यासारखी माहिती रियल टाईम मिळत आहे.
बॉक्स
कोट
विभागातील आठही आगारातील एकूण ४७० बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आले आहे. ही यंत्रणा मोबाइल अॅपशी जोडण्यात आलेली असल्याने प्रवाशांना एसटी बसचे लाईव्ह लोकेशन घरबसल्याच कळणार आहे. परिणामी बसस्थानकावरील त्यांची प्रतीक्षा थांबणार आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक
.................................
निष्काळजीला बसणार आळा
बसेस कोणत्या मार्गावर, कुठे थांबवायच्या, याची जागा महामंडळाने निश्चित केली आहे; मात्र बसचालक मनात येईल त्या ठिकाणी व हव्या तितक्या वेळ बस थांबवत असतात. त्यावर कुणाचे नियंत्रण नसते. हे नियंत्रण या सिस्टमद्वारे केले जात आहे. एखाद्या हॉटेलवर बस अधिक वेळ का थांबली, याचा जाब चालकाला विचारता येणार आहे. या सिस्टममुळे चालकांच्या मनमानीला आळा बसला आहे.
बॉक्स
बसस्थानकात लागलेत स्क्रीन
अमरावती विभागांतर्गत पाच आगार असून, पाचही बसस्थानकावर स्क्रीन लागल्या आहेत. या स्क्रीनवरून लागणाऱ्या बसेस, कोणत्या मार्गाने जाणार, बस सुटण्याची वेळ, विलंब होणार असल्यास अपेक्षित वेळ आदी माहिती झळकत आहे. माहिती मिळत असल्याने प्रवाशांची गैरसोय थांबली आहे.