विद्यापीठात संगणकशास्त्र विभागप्रमुखांची वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:21+5:302021-02-24T04:14:21+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रवेशापासून वंचित ठेवल्याप्रकरणी संगणकशास्त्र विभागप्रमुख व्ही.एम. ठाकरे यांची वार्षिक वेतनवाढ ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रवेशापासून वंचित ठेवल्याप्रकरणी संगणकशास्त्र विभागप्रमुख व्ही.एम. ठाकरे यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. चौकशी समितीच्या निर्णयानंतर कुलसचिवांनी वेतनवाढ रोखण्याचे आदेश १७ फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहे. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी दिलीप उईके यांनी सन २०१९ मध्ये आचार्य पदवी प्रवेशाकरिता विद्यापीठात अर्ज सादर केला होता. कागदपत्रे पूर्ण असतानासुद्धा उईके यांना आचार्य पदवी प्रवेशापासून नाकारण्यात आले होते. परिणामी दिलीप उईके, मोईन देशमुख आदींनी आचार्य पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या संगणकशास्त्र विभागप्रमुख व्ही.एम. ठाकरे यांच्या अफलातून कारभाराविरोधात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कुलगुरू चांदेकर यांनी अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षेत चौकशी समिती गठित केली. वर्षभराच्या चौकशीनंतर अधिष्ठाता रघुवंशी यांनी चौकशी अहवाल सादर केला. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने व्ही.एम. ठाकरे यांनी आचार्य पदवी प्रवेशात केलेल्या गैरवर्तनाबाबत खुलासा मागितला होता. परंतु, ठाकरे यांनी सादर केलेला खुलासा वस्तुस्थितीदर्शक आणि सुसंगत नसल्याचा ठपका कुलगुरूंनी ठेवला. त्यामुळे वर्तणूक शिक्षकांच्या सेवाशर्ती संदर्भातील अध्यादेश क्रमांक १२२ चे कलम ७ मधील परिच्छेद ३९, ४० (१) व (६) अध्यादेशातील परिशिष्ट ६ नुसार वर्तणूक अपेक्षाभंग करणारी असल्याने व्ही.एम. ठाकरे यांना शिक्षा ठोठावण्यात येत असून, १ जुलै २०२१ रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलसचिव तुषार देशमुख यांनी आदेश जारी केले आहे.
------------------
गुन्हा सिद्ध होऊनही त्याच पदी कायम
संगणक शास्त्र विभागप्रमुख व्ही.एम. ठाकरे यांनी आचार्य पदवी प्रवेशप्रकरणी गैरवर्तन केल्याबाबतचा गुन्हा सिद्ध झाला आहे. किंबहुना वार्षिक वेतनवाढही रोखण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. मात्र, ठाकरे यांच्याकडे असलेली जबाबदारी कायम ठेवल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.