शिरजगाव कसबा येथे तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:59+5:30
पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे व उपनिरीक्षक मंगेश डांगे यांच्याकडून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही संप्रदायातील निवडक प्रतिनिधींना बोलावून शांतता व सुव्यवस्थेसाठी चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरजगाव कसबा : आर्थिक व्यवहारातून दोन व्यक्तींमध्ये झालेल्या हाणामारीमुळे दोन समुदायात तणाव निर्माण झाला. येथील आठवडी बाजार परिसरातील चहा विकणाऱ्या दुकानावर ३ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला. सध्या गावात शांततापूर्ण वातावरण असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी शिरजगाव कसबा गाठले.
पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे व उपनिरीक्षक मंगेश डांगे यांच्याकडून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही संप्रदायातील निवडक प्रतिनिधींना बोलावून शांतता व सुव्यवस्थेसाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेला जि.प.चे माजी सभापती मनोहर सुने, बाळासाहेब सोनार, नाजिम बेग, मुक्तार कुरेशी, अश्फाक काजी व ओम कुऱ्हाडे उपस्थित होते. दोन्ही समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी दिली. घटनेत मध्यस्थी करणारे व गंभीर जखमी झालेले आसिम मो. सलीम तसेच यासीन कुरेशी यांच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून नीलेश दाभाडे, नवल बदुकले, शुभम अस्वार, गोलू मजीत पटेल, अब्दुल रहीस शेख हुसेन या आरोपींना अटक करून चांदूरबाजार न्यायालयात हजर करण्यात आले. व्यक्तिगत जामीन मंजूर करून सर्व आरोपींची गुरुवारी पोलीस कोठडीतून सुटका करण्यात आली.