अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील ८७ चालक कम वाहक भरतीपूर्व प्रशिक्षण व पदभरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला. कोरोनासह लॉकडऊनमुळे गत वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तूर्तास प्रशिक्षण व त्यानंतर होणारी नियुक्तीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
एसटी महामंडळातर्फे सन २०१६-१७ व २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, गतवर्षी अतिरिक्त खर्चाला लगाम लावण्याच्या उद्देशाने निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली. यात अमरावतीसह अन्य जिल्ह्यांचा समावेश होता. या नोकर भरतीत चालक व वाहकांची पदभरती होणार होती. अनलॉकनंतर एसटी महामंडळाची सेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर भरती प्रक्रियावरील स्थगिती उठविण्यात आली. आता राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढल्याने तसेच कठोर निर्बंध लागू झाल्याने चालक वाहकांचे प्रशिक्षण व पदभरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.
कोट
विभागात चालक कम वाहकांची प्रशिक्षणाची कार्यवाही सुरू होती. परंतु, सध्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रशिक्षण व त्यानंतर करावयाची पदभरतीची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक