बेकरी व्यवसायातील वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:12 AM2021-05-16T04:12:34+5:302021-05-16T04:12:34+5:30
अमरावती : बेकरी व्यवसायातील वादातून रामपुरी कॅम्प परिसरात एका कुटुंबातील नातेवाईकांमध्ये राडा झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी खळबळ उडाली होती. दोन्ही ...
अमरावती : बेकरी व्यवसायातील वादातून रामपुरी कॅम्प परिसरात एका कुटुंबातील नातेवाईकांमध्ये राडा झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी खळबळ उडाली होती. दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका सदस्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग करून त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेच्या अनुषंगाने गाडगेनगर ठाण्यात परस्परविरोधी तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी जयकुमार रामचंद्र मेठानी (३३) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा व आरोपी अजय मेठानी, विजय मेठानी, रवि मेठानी व पवन मेठानी (सर्व रा. रामपुरी कॅम्प) यांचा बेकरीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांचे नेहमीच वाद होतात. १४ मे रोजी सायंकाळी काकाच्या मुलाने थापड मारल्याचे त्यांना बहिणीने सांगितले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे मोठे वडील थंवरदास मेठानी मध्यस्थी करण्यास आले असता, विजय मेठानीने त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारून जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी ढकलून दिले, असे जयकुमार मेठानी यांनी तक्रारीत म्हटले आहे. जखमीच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून चाैघांना अटक केली.
बॉक्स
महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याची धमकी
रामपुरी कॅम्प येथील ३३ वर्षीय युवकाच्या तक्रारीवरून आरोपींनी व्यवसायात आपसी द्वेषातून गैरकायद्याची मंडळी जमविली आणि चुलत बहिणीचा विनयभंग केला. तसेच लोखंडी रॉडने मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून गाडगेनगर पोलिसांनी प्रकाश मेठानी, दीपक मेठानी, सूरज मेठानी, नितीन मेठानी, जय मेठानी, अशोक मेठानी, विनोद मेठानीविरुध्द गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.