मोर्शी : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने एका २५ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. ६ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हिवरखेड येथे ही घटना घडली. गुप्तीसारख्या शस्त्राने शेख रोशन शेख हाफिज (२५, गुजरीबाजार, हिवरखेड) याला ओरखडण्यात आले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी नीलेश गाडेकरविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
अंबाडा येथे तरुणाला मारहाण
मोर्शी : तालुक्यातील अंबाडा येथील अजय युवनाते (२५) याला कु-हाडीने मारहाण करण्यात आली. ६ मे रोजी अंबाडा येथे ही घटना घडली. घरासमोर गाणी का वाजवतो, या कारणावरून हा वाद झाला. मोर्शी पोलिसांनी आरोपी सुभाष कुमार (रा. अंबाडा) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
खाऱ्या टेंबरू येथे मारहाण
धारणी : तालुक्यातील खाऱ्या टेंबरू येथे एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. ७ मे रोजी सकाळी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मनीष कासदेकर (रा. खाऱ्या टेंबरू) विरूद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
------------
जसापूर भागातून रेतीची चोरी
खल्लार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसापूर येथे रेतीची अवैध वाहतूक व चोरी उघड झाली. तलाठ्याच्या इशाऱ्याला न जुमानता ट्रॅक्टरचालक ट्रॉलीमधील रेती जसापूर येथील एका घरासमोर खाली करून ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळाला. याप्रकरणी तलाठी राहुल आवारे यांच्या तक्रारीवरून आरोपी सलमान शेख अ. राजीक (२९, नांदेड बु.)विरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
बोरगाव धांदे येथे तरुणाला मारहाण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील बोरगाव धांदे येथील पेट्रोलपंपाजवळ अश्विन वानखडे (२३, रा. खल्लार) याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याच्या वाहनातील ८ हजार रुपये किमतीचे साहित्य घेऊन पोबारा करण्यात आला. ६ मे रोजी रात्री ही घटना घडली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी सुलतान शेख, सागर मार्कंड व अन्य दोन (सर्व रा. पुलगाव) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
तारखेड येथे मारहाण
तिवसा : तालुक्यातील तारखेड येथील अंकुश घडेकर (३०) याला काठीने व हातोड्याने मारहाण करण्यात आली. ७ मे रोजी सकाळी ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी गंगाधर रंगारी (५०), राजकुमार रंगारी (रा. तारखेड) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
वरखेडमधून रेतीसह टिप्पर जप्त
तिवसा : तालुक्यातील वरखेड येथे एमएच २७ बी एक्स ९३९३ या क्रमांकाचा टिप्पर रेतीसह जप्त करण्यात आला. ७ मे रोजी पहाटे तिवसा पोलिसांनी ही कारवाई केली. १५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर आरोपी यशवंत पाटील (रवाळा), शिवा तागडे (४०, बडनेरा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
----------
जामगाव येथून तूर, चणा लंपास
वरूड : तालुक्यातील जामगाव शिवारातून ८० हजार रुपये किमतीची तूर व चणा लंपास करण्यात आला. ६ ते ७ मे दरम्यान ही घटना घडली. शेतमालक नारायण गावंडे (शारदानगर, अमरावती) यांच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
तरुणीच्या घरात शिरून अतिप्रसंग
परतवाडा : शहरातील एका २० वर्षीय तरुणीच्या घरात शिरून तिचेवर अतिप्रसंग करण्यात आला. २६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी शीतल काळे (३८, रा. खानझोडे रेसिडेन्सी) विरूद्ध ७ मे रोजी भादंविचे कलम ३७६, ४५२ व अॅट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
-----------------
धारणीत पुन्हा अतिक्रमण
धारणी : शहरात अतिक्रमणाचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असून नगरपंचायतीने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. रस्ता दुभाजकानंतर निर्माण करण्यात आलेल्या नालीच्या बाजूला असलेली शिल्लक शासकीय जागा लोकांसाठी पर्वणी ठरत आहे. अशाप्रकारे श्रीराम मंदिरसमोरील शासकीय जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.
------------
वेगवान डंपर, अपघाताला निमंत्रण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील रस्त्यावर होणारे अपघात हे वेगाने धावणाऱ्या डंपरने धडक दिल्याने होत असून, रेती, मुरूम, खडीने भरलेले हे डंपर रात्रंदिवसा अतिवेगाने धावत असतात. वाहतूक पोलीस इतर वाहनांवर कारवाई करताना दिसतात. त्यांना हे डंपर कसे काय दिसत नाही, यावर चर्चा सध्या गावा-गावात सुरू आहे.
----------------------
चांदूरबाजार तालुक्यात रेतीचे उत्खनन
चांदूरबाजार : तालुक्यातील काही मोजक्या नदीपात्रातून रेती तस्करी होऊ नये, यासाठी महसूल यंत्रणेकडून उपाययोजना केल्या गेल्या. त्यामुळे तस्करांनी त्या जागा सोडून नदीच्या दुसऱ्या तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. मासोद, फुबगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव या भागातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत होत आहे.
-------------
वरूड तालुक्यातील विद्युत रोहित्र कुचकामी
वरूड : तालुक्यातील बेलोरा येथे पळसवाडा ते बेलोरा या पांदण रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत डीबीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या विद्युत रोहित्रापासून धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात वादळवारा व पावसादरम्यान अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
-----------------------------
राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे
वरूड : नव्याने तयार करण्यात आलेल्या अमरावती -पांढुर्णा महामार्गावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी त्यासाठी आंदोलन केले. आता पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------------
चांदूरबाजार शहरात कचरा रस्त्यावर
चांदूर बाजार : शहरात नगरपालिकेद्वारे अनेक चौकांत व प्रभागांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना कचरा टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी सुद्धा फिरत असते. असे असताना शहरातील अनेक भागांमध्ये कचरापेटीच्या बाहेर कचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
------------------