अंजनगाव ते दर्यापूर मार्गावर प्रवासी निवाऱ्याची वानवा
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव ते दर्यापूर मार्गाचे नव्याने बांधकाम झाले. या मार्गावर आता एकाही फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रत्येक फाट्यावरचे प्रवासी निवारे जुने झाले असल्याने व रस्ता रुंदीकरणात येत असल्याने जमीनदोस्त करण्यात आले, तर काही शिकस्त झाले. त्यामुळे रस्ताचे काम पूर्णत्वास येत असूनसुद्धा नवीन प्रवासी निवारे प्रशासनाने तयार केले नाहीत.
-------------
लेहेगाव ग्रामपंचायतला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
मोर्शी : केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने आपली मोहोर उमटविली. ही ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. लेहेगाव येथे विविध समाजपयोगी उपक्रम राबविताना प्रशासकीय नियम व अटींचे पालन करीत गावकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गावात वृक्ष संवर्धन व स्वच्छता, शिक्षण, सौरऊर्जेवर भर देण्यात आला.
--------------
रसुलापूर रस्ता बांधकामात निकृष्टतेचा आरोप
चांदूर बाजार : तालुक्यातील रसुलापुर ते धानोरा या डांबरीकरण रस्ताचे बांधकाम सुरू आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे स्थानिक सरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रसुलापूर ते धानोरा हा १.३ किलोमीटर डांबर रस्त्याचे काम सुरू आहे.
--------------
चांदूर रेल्वेतील अतिक्रमण ‘जैसे थे’
चांदूर रेल्वे : शहरालगत रेल्वे गेटलगतची दुकाने हटविण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. रेल्वे गेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रोडलगत एक फुटांवरच असून, एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने एका रांगेत झालेली आहेत. शहरातही अतिक्रमणाची तीच परिस्थिती आहे.
-------------------
पावसाळ्याआधी व्हावी मेळघाटातील रस्त्यांची दुरुस्ती
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या सीमारेषांमुळे दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या बांधकामाची परवानगी न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटात दरड कोसळून वाहतूक बंद होते. त्याअनुषंगाने रस्त्यांची डागडुजी पावसाळ्याआधी व्हावी, अशी मागणी होत आहे.
-------------
लॉकडाऊनमुळे दूधविक्रेते संकटात
कावली वसाड : कावली, दाभाडा, वाठोडा या गावात दूध डेअरी असून, त्यामध्ये हजारो लिटर दूध संकलित करण्यात येत आहे. गावातील काही तरुण दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून धामणगाव रेल्वे येथे घरोघरी दूध विकतात. मात्र, ९ मेपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये दूध डेअरीदेखील बंद राहणार असल्याने दररोज निघणारे दूध शहरात न्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------------
तीन वेळा घ्या वाफ
भातकुली : वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी, झिंक व मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांचे सेवन तसेच आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले. दिवसातून तीन वेळा वाफ घ्यायची आहे व आपल्या नाकावाटे वाफेस शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडायची ही प्रक्रिया दहा वेळा करायची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा तीन मिनिटे लागतात. साध्या पाण्याची वाफ घेतली तरीही उत्तम आहे.
--------------