अमरावती : प्रशांत नगर गार्डनजवळील रोडे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आशिष गावंडे स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित रक्तदान शिबिराला महापालिका आयुक्त प्रशांत रोडे व नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी भेट दिली. पीडीएमसीच्या चमूने रक्त संकलन केले. डॉ. विक्रम रोडे, डॉ. विनोद रोडे, सुरेश रोडे, बाळासाहेब गावंडे, सुशील गावंडे, अमित गावंडे, डॉ. ऋतुजा रोटे, डॉ. गौरव गोहाड, डॉ. सतीश शिरभाते, विनय गोहाड, कुणाल गोहाड, अपूर्वा गोहाड, सुमीत गावंडे, पराग शेंडे, मंगेश कडू, गोवर्धन दिवाण, डॉ. वर्षा रोडे, दिनेश देशमुख, ऋग्वेद डांगरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
---------------------
वृक्षारोपण, वृक्षभेटीने वटसावित्री उत्सव
अमरावती : श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात वटसावित्री दिनी इको क्लब व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षारोपण करून वृक्षभेट व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. प्राचार्य दीपाली भारसाकळे यांनी वडाचे रोप लावले. सर्व कर्मचाऱ्यांना आंबा, बांबू, निंब, चिंच आदी झाडांची रोपे भेट दिली. याप्रसंगी सर्वांनी वृक्षारोपण व संवर्धनाची शपथ घेतली. कर्मचारी सारिका इंगोले, निशा काळे, माधुरी बोबडे, सोनाली देशमुख, प्रभा ढोमणे, उषा नाळे, अमोल आगरकर व पाटील हे उपस्थित होते.
-----------------
कुरळी येथे वाहनांच्या धडकेत क्लीनर ठार
वरूड : तालुक्यातील कुरळी येथे पेट्रोल पंपानजीक दोन वाहनांच्या धडकेत क्लीनर निकेश दिनेश करुले हा ठार झाला. देवानंद श्रीकृष्ण सोनार (४०, रा. टाकरखेडा मोरे) याने आपले वाहन निष्काळजीपणाने चालवून बंडू सुखदेवराव घाटे (५०, रा. एकलारा) यांच्या वाहनाला मागून धडक दिली. यात निकेश हा केबिनमध्ये दबून मरण पावला. २४ जून रोजी हा अपघात घडला. वरूड पोलिसांनी देवानंदविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
भावांच्या भांडणात लोखंडी टॉमीने मारहाण
वरूड : शहापूर येथे राजू मलकु धुर्वे (४०) याने सेंट्रिंग काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी टॉमीने धनराज मलकु धुर्वे (४५) याच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले. त्याची मुलगी व पत्नी भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही हातावर मारले. २१ जून रोजी ही घटना घडली. वरूड पोलिसांनी राजूविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
बोअर न करता शेतकऱ्याला मारहाण
मोर्शी : बोअर करण्यासाठी दिलेले २० हजार रुपये परत मागण्याकरता आरोपीच्या शेतात गेलेल्या इसमाला दोघांनी काठ्यांनी मारहाण केली. अंबाडा शिवारात ही घटना घडली. सुनील नागोराव खवले (रा. यावली शहीद) असे जखमीचे नाव आहे. राजेश खेरडे (रा. अंबाडा) व त्याचा मित्र यांच्याविरुद्ध मोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ११ जून रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार २४ जून रोजी करण्यात आली. मारहाणीत सुनीलचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.
---------
घरफोडी करून पळविले २५ हजार
परतवाडा : नजीकच्या देवमाळी येथील श्रीधर किशनराव सोनार (६५) यांचे घर फोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील कॅरीबॅगमध्ये ठेवलेले पंचवीस हजार रुपये लंपास केले. २० ते २३ जून दरम्यान ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी २४ जूनला गुन्हा नोंदविला.
----------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १५ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. १८ जून रोजी रात्री १ च्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. परतवाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
पाडा शिवारातून दुचाकी लंपास
शिरजगाव कसबा : नजीकच्या पाडा शिवारातून प्रदीप प्रल्हादराव वराडे यांची एमएच २७ बीपी ५९०२ क्रमांकाची दुचाकी २४ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात २४ जून रोजी तक्रार नोंदविली.
-------------
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अचलपूर : चिखलदरा येथे फिरायला नेण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३६६ ब, ३७६ (२) (१), ३७७, ५०६ सहकलम ४, ८ लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये रोहित संजय सोनार (२४, रा. विलायतपुरा, अचलपूर) याच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला.
------------
पूर्णानगर येथून विनापरवाना रेती जप्त
असेगाव पूर्णा : नजीकच्या पूर्णानगर येथून ट्रॅक्टर ट्रॉली, मोबाईल, रेती असा ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल आसेगाव पोलिसांनी जप्त केला. रेती विनापरवाना वाहून नेण्यात येत होती. याप्रकरणी सचिन संजय बोडके व मोहम्मद दानिश अब्दुल अजीज सौदागर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. २६ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.
-----------------
शेतमजुराच्या घरातील रोकड लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील खिराळा येथील रावसाहेब सोमाजी आठवले यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी धान्याच्या कोठीत ठेवलेले १४ हजार २०० रुपये लंपास केले. 24 जून रोजी ते कुटुंबासोबत शेतमजुरीला गेले असताना ही घटना घडली. अंजनगावसुर्जी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
झाडगावात पाडले शेजाऱ्याचे दात
मंगरूळ दस्तगीर : आमच्या जागेत ठेवलेल्या गाडीचे फोटो का काढले, अशी विचारणा करीत गजानन नामदेव कांबळे व नामदेव महादेव कांबळे यांनी विनोद अजाबराव कुरवाडे यांना मारहाण केली. गजाननने तोंडावर बुक्की दिल्याने विनोदचे दोन दात तुटून पडले. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. २४ जून रोजी ही घटना घडली.