सावकारांचा टक्का वाढला
ब्राम्हणवाडा थडी : गावातील खासगी सावकारीला ऊत आला आहे. दरशेकडा दरमहिन्याला त्यांचा टक्का वाढत आहे. त्यासाठी दलालांची साखळीच तयार झालेली आहे. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल कमीशन घेत आहेत. कितीही रक्कम परत करा, मात्र मुद्दल बाकीच, अशी गावागावांतील स्थिती आहे.
--------------
तालुक्यातील उघडी रोहित्रे जीवघेणी
चांदूर बाजार : तालुक्यातील हैदरपूर वडाळा फिडरवर शिरजगाव बंड ते निंभोरा या पांदण रस्त्यालगत माकोडे यांच्या शेतातील डीबी भंगार अवस्थेत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
----------------------------
मोर्शीतून खासगी वाहतूक जोरात
नेरपिंगळाई : मोर्शी शहरातून आंतरराज्यीय खासगी प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असून याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष आहे. एसटी बस स्थानकासमोरून राष्ट्रीय महामार्गावर बसेस उभ्या करून पांढुर्णा, मुलताई तसेच नागपूरकडे सकाळपासून रात्रीपर्यंत खासगी वाहतूक केली जात आहे. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे.
------------------
शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याचे गंडांतर
अमरावती : शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार केली आहे. कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर कमी पटाच्या शाळांतील विद्यार्थी जवळपासच्या शाळांमध्ये समायोजित जाणार आहे. मात्र, राज्यात सद्यस्थितीत १३०० शिक्षक अतिरिक्त असून, कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील सुमारे १० हजार शिक्षकांवर नव्याने अतिरिक्त ठरण्याचे गंडांतर आहे.
--------------------
विवाहितेचा शारीरिक छळ
दर्यापूर : येथील एका ३६ वर्षीय विवाहितेचा तीन लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला. २६ मे २०१८ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दर्यापूर पोलिसांनी आरोपी योगेश चक्रे, प्रकाश चक्रे, विलास मेश्राम व एक महिला (सर्व रा. बेलपुरा, अमरावती) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------------
राजापेठ भागातील नाल्या तुंबल्या
अमरावती : राजापेठ भागातील नाल्या तुंबल्या आहेत. संबंधित स्वच्छता कंत्राटदाराकडून नाली स्वच्छतेबाबत हाराकिरी केली जात आहे. याबाबत एका नगरसेवकास सांगितल्यास तो दुसºयाकडे अंगुलीनिर्देश करतो. या भागातील नाल्या प्रवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
------------
रामपुरी कॅम्प येथे स्वच्छतेचा बट्याबोळ
अमरावती : शिवाजीनगर कॅम्प भागातून रामपुरी कॅम्प भागाकडे जाणाºया रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शिवाजी हॉर्टिकल्चर कॉलेजजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. तो कचरा उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
---------------