अमरावती : पर्यटन संचालनालयातर्फे स्वातंत्र्याचे ७५ वर्षे ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवार, २६ सप्टेंबर रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिले नोंद करणारे ७५ सायकलपटू सहभागी होतील.
जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पर्यटन संचालनालय व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय व अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्यावतीने २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविड १९ च्या नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने या रॅलीत केवळ ७५ सायकलपटूंना सहभाग घेता येईल. रॅलीत सहभागी होणाऱ्यांना मास्क, डिस्टन्स आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन करणे अनिवार्य राहील. ही रॅली अमरावती ते यावली (शहीद) आणि परत अमरावती अशी ६० किलोमीटरची राहणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी केले आहे.