फोटो जे-२४ - इर्विन हॉस्पिटल
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेटसह अन्य प्रमाणपत्र मिळविण्याकरिता येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची दलाल परस्पर फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी असून, त्या दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे पोलीस आयुक्तांना करण्यात आली. तसे निवेदनही देण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य सामान्य रुग्णालयात विविध प्रकारच्या फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्याकरिता जिल्हाभरातून विद्यार्थी, सरकारी कर्मचारी येतात. त्यांना येथील माहिती नसल्याने ते काऊंटरवर चिठ्ठी काढताना विचारणा करतात. तेव्हाच बाजूला बसलेले दलाल सक्रिय होऊन त्या व्यक्तीच्या मागे लागून सर्टिफिकेट मिळवून देण्याची हमी देतात. त्यासाठी लागणारे शुल्क दहापट सांगून पैसे उकळतात. अशा अनेक घटना तेथे घडल्याचे ‘लोकमत‘ने पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तेथे शिरकाव करणाऱ्या दलालावर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यावर पोलीस आयुक्तांकडून सिटी कोतवाली ठाण्यात निवेदन देण्याचे सुचविण्यात आले होते. दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी सिटी कोतवाली ठाण्यात तसे निवेदन देण्यात आले.
बॉक्स
इर्विनच्या चौकीतील पोलीस मदतगार
रुग्णालयात अशा घटना घडत असतली तरी इर्विनच्या पोलीस चौकीत संपर्क करण्याचे पोलीस आयुक्तांनी सुचविले. मात्र, चौकीतील पोलीस बाहेरील व्यक्तीसोबत फिरताना दिसून येतात. संबंधित व्यक्तीला मदतसुद्धा करताना दिसून आल्याचे सिटी कोतवाली पोलिसांत दिलेल्या निवेदनात नमूद आहे.